एक देव आहे हा भाव पै
197.
एक देव आहे हा भाव पै सोपा । द्वैतरूप बापा पडसी नरकी ॥१॥
द्वैत सांडी अद्वैत धरी । एक घरोघरी हरी नांदे ॥२॥
सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वी । तोचि अर्जुनासि दुष्ट जाला ॥३॥
गयनि प्रसादे निवृत्ति बोधु । अवघाचि गोविंदु अवध्य रूपी ॥४॥
अर्थ:
जर एकात्म देव आहे तत्व मानले नाही व त्यात द्वैत पाहिले तर नरकाला जावे लागेल. तेंव्हा आपल्यामध्ये असलेले द्वैत टाकले की सर्व घरा मध्ये तो हरिच राहत आहे ही भावना दृढ होते. अर्जुनाचा साह्यकारी म्हणुन दिसणारी तो श्रीकृष्ण सर्व विश्वात ओतप्रोत भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपे मुळे सर्व रुपात त्या गोविंदाला मी पाहात आहे.
