जेणे तुज जाले रूप आण
425.
जेणे तुज जाले रूप आणि नांव । पतित हे दैव तुझे आम्ही ॥१॥
नाही तरी तुज कोण हो पुसते । निराकारी तेथे एकाएकी ॥धृपद॥
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥२॥
धन्वंतरी रोगे आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावे त्या ॥३॥
अमृतासी मोल विषाचिया गुणे । पितळे तरी सोने उंच निच ॥४॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जान । तुज देव पणा आणियेले ॥५॥
अर्थ :
देवा पतीता करताच तुला नाम रूपाला यावे लागले म्हणजेच याचाअर्थ : असा होतो की, आम्ही पतीतच खरे तुझे दैवत आहोत. नाही तर तू निराकार स्वरुपस्थितीने असतास तर तुला कोणी मानले असते. आंधरानेच दिव्याच्या प्रकाशाला शोभा आणली आहे व कोणंदणाच्या योगाने माणिक शोभून दिसते. वैद्याला रोगा मुळेच प्रसिद्धी मिळते. जर सर्व सुखी निरोगी असते, तर वैद्याकडे जाण्याचे कोणाला काय कारण होते ? विषा मुळेच अमृताला मोल चढते आणि पितळ हा धातू हलका आहे म्हणून सोन्याला श्रेष्टता प्राप्त झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला, आम्ही असे पतित असल्यामुळेच तुला देवपणाचा मोठेपणाला आणले आहे हे तू समजून राहा.
