द्या जी आम्हा काही स
3998.
द्या जी आम्हा काही सांगा जी रखुमाई । शेष उरले ते ठायी सनकादिका ॥१॥
टोकत बाहेरी बैसलो आशा । पुराया ग्रासा एकमेका ॥धृपद॥
येथवरी आलो तुझिया नावे । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥
प्रेम देउनिया बहुडा आता दिला । तुका म्हणे आता विठ्ठला बोला ॥३॥
अर्थ :
हे रुखुमाबाई माते देवाच्या ताटामध्ये जे काही उच्चिष्ट उरले आहे त्यातील आम्हाला काहीतरी थोडेसे दया असे तुम्ही सनकादिकांना सांगा. अहो आम्हाला देवाचे काहीतरी उच्चिष्ट मिळेल याची अपेक्षा धरून आम्ही बाहेर काहीतरी टोकत बसलो आहोत एकमेकांना पुरेल असा घास तुम्ही आम्हाला दया एवढी आमच्यावर कृपा करा. हे दातारा आम्ही तुमच्यावर मोठी अपेक्षा करुन येथपर्यंत आलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने आम्हाला त्यांच्या ताटातील उच्चिष्ट प्रेमपूर्वक दिले व आम्हाला घरी जाण्यास निरोप दिला त्यामुळे आता तुम्ही विठ्ठल नामाचा गजर करा व वेळोवेळी विठ्ठल विठ्ठल बोला.
