वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › २१. इला चरित्र

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088311 · अभंग क्र. २१

21.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय एकविसावा ॥
सहस्रार्जुनाने रावणाला बांधून नेले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रम्य नर्मदेचा तीरीं । राक्षसेंद्र पंचद्वयशिरी ।
पूष्पोपहारें अर्चिता त्रिपुरारी । काय तेथे वर्तले ॥१॥
येरीकडे सहस्रार्जुन भूपाळ । महिष्मतीचा नृपशार्दूळ ।
श्रीरेवेमाजि स्त्रियांसहित केवळ । क्रीडा जळीं करीत होता ॥२॥
स्त्रियांसहित अर्जुन । क्रीडतसे आनंदें पूर्ण ।
सहस्रहस्तीनींसीं एकला जाण । ऐरावती खेळे जैसा ॥३॥

सहस्राजुनाने क्रीडेच्या वेळी आपल्या बाहूंनी नर्मदा
अडविल्यामुळे तिचे पाणी सर्वत्र पसरून रावणाची शिवपूजा मोडली :

जाणावया भुजबळाची थोरी । स्वभुजा पसरोनि भीतरी ।
अवरोधूनि रेवातीरीं । स्तब्धता झाली ते काळी ॥४॥
सहस्त्रबाहूंच्या बळी । नर्मदा रोधन झाले ।
समुद्रासारिखी ते काळी । चढती झाली उदकेसीं ॥५॥
देखोनिया आत्मजातें । उदधीसि दाटे भरिते ।
जाणोनि अर्जुनाचे विक्रमातें । नर्मदा तेथे वाढली ॥६॥
कार्तवीर्यभुजींकरोन । सेतूसारिखें दिसे जीवन ।
अवलोकिता दिशांचे भान । अणुप्रमाण लक्षेना ॥७॥
वैश्रवणारि पूजा करीत होता । तयासि वाटली अपूर्वता ।
म्हणे अवकाळीं सरिता । माधव नसता दाटली ॥८॥
होते पूजचें संभार । वाहों लागले दाटले नीर ।
तेणे गजबजिला लंकेश्वर । म्हणे विघ्न थोर ओढविले ॥९॥
मीन नक्र मगर दुर्धर । आणीकही जळचरें अपार ।
दाटलीं तेणे दशशिर । कासावीस पै झाला ॥१०॥
नाकी तोंडी भरले पाणी । प्रधान गजबजिले देखोनि ।
म्हणती समुद्र मर्यादा टाकूनी । आजिंचे दिनी वाढला ॥११॥
विसर्जून शिवपूजेतें । नित्यनेम कैंचा तेथे ।
हृदयी दाटले भयातें भरतें । कांही त्याते स्मरेना ॥१२॥
जेंवि रुसली योषिता पतीसी । अवरोध करी गृहकृत्यासी ।
तैसे झाले रावणासी । चहूंकडेसी पाहतसे ॥१३॥
तंव देखे जैसा सागर । तैसे दाटले नर्मदानीर ।
रावण प्रधानांप्रति सत्वर । बोलत झाला ते समयी ॥१४॥
नर्मदेचा उगम पूर्वेहून । तेथे वर्षला नाही घन ।
पाणी चढलें पश्चिमेकडून । काय कारण पहावे ॥१५॥
ऐकोनि रावणाची गोष्टी । प्रधानीं आकाशी उठाउठी ।
अर्ध योजने क्रमूनि सृष्टी । पुढे आश्चर्य दृष्टी देखिले ॥१६॥

प्रधानांकडून रावणाला सहस्त्रार्जुनाची माहिती :

कोणि एक पुरूषपंचानन । क्रीडे स्त्रियांसह-वर्तमान ।
सहस्त्रभुजाचें बळेंकरुन । नदी तेणे अवरोधिली ॥१७॥
साळईच्या वृक्षासमान । अंगकांति तैसा जाण ।
पर्वतमाथा शिखर पूर्ण । स्कंधावरी शिर तैसे शोभे ॥१८॥
नेत्र अग्नीसारिखे आरक्त । मुखी जिव्हा लळलळित ।
उदकी सहत्र पसरोनि हात । ओघ कोंडिला भुजबळे ॥१९॥
ऐसे देखोनि शुकसारण । रावणाप्रति बोलती वचन ।
म्हणे राया अपूर्व कथन । सांगता आश्चर्य वाटतें ॥२०॥
साळईच्या वृक्षासमान । कोणी एक पुरूष बळवान ।
पिंगट केस आरक्त नयन । जिव्हा जाण विद्युल्लतासी ॥२१॥
समवेत योषितासि नाही मिती । त्यांसह क्रीडतो जळाप्रती ।
हस्तिनिंमध्ये जैसा हस्ती । तैसा नृपती खेळतसे ॥२२॥
सहस्त्रभुजांचा भूपती । तेणे अवरोधली नदी निश्चिती ।
ऐसे ऐकोनि मंदोदरीपती । क्रोध चित्ती उद्भवला ॥२३॥

रावण युद्धार्थ ससैन्य निघाला :

ऐकोनि प्रधानमुखींचें वचन । क्रोधे खवळला रावण ।
म्हणे न लागता अर्ध क्षण । निर्दाळीन अर्जुनातें ॥२४॥
इतकें बोलोनि लंकापती । सवे प्रधान शस्त्रे हाती ।
संग्रामोत्कंठा धरोनि चित्ती । प्रयाण करिती लवलाहें ॥२५॥
ते समयी अर्जुनासन्मुख । प्रयाण करी दशमुख ।
राक्षस देते झाले हाक । जैसे मेघ गर्जत अंबरी ॥२६॥
महोदर शुक सारण । महापार्श्व धूम्राक्ष जाण ।
परिवेष्टीत पौलस्तिनंदन । जेथ अर्जुन तेथे आले ॥२७॥
अति शिघ्र तये काळी । राक्षसेंद्र महाबळी ।
येता झाला अर्जुनाजवळी । जो भयानक डोहीं क्रीडतसे ॥२८॥
जिया डोहींचें शाश्वत जीवन । श्यामवर्ण माजि मगर मीन ।
शोभे तीरीं रम्य वन । फळपुष्प पूर्ण तया ठायी ॥२९॥
तया डोहाभीतरीं । रावो क्रीडत परिवेष्टीत नारी ।
गीत नृत्य नानापरी । मृंदंगझल्लरी रुणझुणती ॥३०॥
नरेंद्र क्रीडता ऐसियापरी । ते देखोनि वैश्रवणारी ।
आरक्तनयन ते अवसरी । बळे उन्मत्त डुल्लत ॥३१॥
ऐसा तो लंकानाथ । गंभीर वाणीनें गर्जत ।
कार्तवीर्याचे प्रधानां म्हणत । भय अद्भुत दावोनी ॥३२॥
प्रधान हो त्वरेंकरुन । राय करा जाणवण ।
युद्धार्थी आलासे रावण । शीघ्र आपण पै यावे ॥३३॥

अर्जुनाची जलक्रीडा संपेपर्यंत थांबण्याची रावणाला विनंती :

ऐकोनि दशग्रीवाचें वचन । अर्जुनप्रधान सन्नद्ध होऊन ।
म्हणती रावणा अर्ध क्षण । सावधान अवधारी ॥३४॥
दुश्चित उन्मत्त स्त्रीसीं रत । अथवा मारू नये निद्रिस्त ।
ऐशियाते वधिता दोष अद्भुत । स्वर्गी क्षोभत पितृगण ॥३५॥
म्हणतीं वंशीं झाला दुराचारी । स्वधर्म सांडूनि अधर्म करी ।
तयासि विमुख त्रिपुरारी । नाना अघोरीं पडेल ॥३६॥
जंव होय सावधान । अर्जुन जळी क्रीडतां आपण ।
तंववरी क्षमा करोनि मने । धैर्य धरोन रहावे ॥३७॥
सावध होईल नृपती । मग तुमची पुरवील मनोवृत्ती ।
तंवपरियंत लंकापती । स्वस्थ चित्ती रहावे ॥३८॥

रावणाच्या प्रधानांकडून अर्जुनाच्या मंडळींचा संहार :

रावणप्रधानीं काय केले । रायाच्या प्रधानांसीं त्रासिले ।
क्षुधित होते तिही कित्येक भक्षिले । कित्येक पळाले जीव घेउनी ॥३९॥
सिंहनाद करिती निशाचर । संग्राम करिते झाले दुर्धर ।
बाण तोमर आणि वज्र । शूळ दुर्धर टाकिती ॥४०॥
कित्येक रावणे मारिले संग्रामी । कित्येक पळाले सांडोनि रणभूमी ।
कित्येक रायापाशी येऊनी । मात जाणविते जाहले ॥४१॥
समुद्र सांडोनि क्षोभे वेळ । मीनमगरां प्रयळकाळ ।
तैसे रावणाचे प्रधान सकळ । मिळोनि दळ त्रासिले आमुचे ॥४२॥
दूतमुखींचें ऐकोनि वचन । कार्तवीर्य कोपायमान ।
क्रोधे नेत्र आरक्त करुन । काय वचन बोलिला ॥४३॥

ते ऐकल्यावर खवळलेला अर्जुन युद्धासाठी निघाला. रावणसैन्याचा विध्वंस :

कार्तवीर्य दूतांप्रती । बोले तुम्ही न भिणें कोणे अर्थीं ।
जळाबाहेर निघाला हस्ती । तैसा राजा चालिला ॥४४॥
क्रोधे नेत्र आरक्त करुन । अग्नीसारिखा देदीप्यमान ।
जैसा कुंडीं हुताशन । तैसा राजा भासला ॥४५॥
धडधडित अग्नि प्रळयकाळीं । संहारीं भूतसृष्टिं ज्वालामाळीं ।
तैसा रावो तये वेळीं । थोर आवेशा पेटला ॥४६॥
वेगी सुवर्णमय गदा घेऊन । जियेतें कांपे का भान ।
सोडिली राक्षसा निर्दळण । करावया ते काळी ॥४७॥
जैसे रवीच्या प्रकाशीं । अंधकारेंसीं जाय निशी ।
तैसे राये राक्षसांसी । गदेकरोनि त्रासिले ॥४८॥
होता खगेश्वराचें आगमन । उरग पळती धाकेंकरुन ।
तैसे नृपनाथे राक्षससैन्य । रणांगणी निवटिले ॥४९॥
सहस्त्रार्जुनाचे गदेकरोनी । राक्षस त्रासिले रणमेदिनी ।
हे प्रहस्त देखोनि नयनी । मार्ग रोधूनी राहिला ॥५०॥
जैसा विंध्याद्रि वाढे अचळ । तेणे मार्गरोधे न चले भानुमंडळ ।
तैसे प्रहस्त घेवोनि मुसळ । पर्वतापरी उभा ठेला ॥५१॥

प्रहस्ताच्या पराभवाने इतरांची धांवपळ :

तदनंतरे तो भूपति जाण । गदा फिरवोनि दारुण ।
प्रहस्ताचे मस्तकी न लागता क्षण । घाव सुबद्ध हाणिला ॥५२॥
गदाघातें तत्क्षणीं । प्रहस्त पाडिला रणमेदिनी ।
देखोनि रावण मनी । विचारी पुढे काय कीजे ॥५३॥
प्रहस्त रणसागरी पडिला । देखोनि शुकसारणां पळ सुटला ।
राक्षसांचा मोड झाला । पुढील कथा अवधारा ॥५४॥

रावण व अर्जुनाचे तुंबळ द्वंद्वयुद्ध :

रावणे धनुष्या वाहिला मेढा । उभा राहिला सहस्त्रार्जुनापुढां ।
कीर्तवीर्य वीर गाढा । रावणासी युद्धा मिसळला ॥५५॥
एक राक्षसेंद्र एक नृपवर । संग्राम करिती दुर्धर ।
जैसा प्रळयीं क्षोभे सागर । तैसे वीर मिसळले ॥५६॥
दोघे पर्वतासमान । उन्मत्त दोघे गज जाण ।
भिडती जयो इच्छून । सावधान पुरूषार्थीं ॥५७॥
जैसे दोनी सूर्य आकाशी । भिडती आपले स्वशक्तीसीं ।
किंवा दोन अग्नि आपले तेजेंसीं । एकमेकांसी भस्म करिती ॥५८॥
दोघे मेघासारिखें करिती गर्जन । पराक्रमे दोघे सिंहचि जाण ।
दोघे उद्र व्याळांसमान । कार्तवीर्य रावण पै देखा ॥५९॥
शचीसहित सुरपती । शंकरे घेवोनि पार्वती ।
सावित्रीसहित प्रजापती । युद्ध पाहती दोघांचें ॥६०॥
गरुडपृष्ठीसी भगवान । अर्धांगी अब्धीचें कन्यारत्न ।
आणीकही सकळ देवगण । युद्ध पाहती दोघांचे ॥६२॥
परस्पर गदा हाणिती । एकमेका निखंदिती ।
एकमेकांसीं निंदिती । समान शक्ती दोघांची ॥६३॥
एकमेकांवरी गदा टाकित । एकमेकांतें हांसत ।
एकमेकांतें म्हणत । शस्त्री सामर्थ्य पै नाही ॥६४॥
प्रळयमेघ करिती गर्जन । तयांपरी दोघे जण ।
हाक देतीं तेणे गगन । अत्यंत गर्जने गर्जत ॥६५॥
सिंहावरी सिंह जैसे । लोटताति बळे आवेशें ।
तैसे नरराक्षसाधीश । करिते झाले युद्धासी ॥६६॥
काळासारिखे दोघे उग्र । नरपति आणि दशशिर ।
परस्परें गदामार । करिते झाले शीघ्रवत ॥६७॥
गदा मारिता एकमेकांसीं । तेणे पडसाद उठे आकाशी ।
युद्ध करिती एकमेकांसी । जयो कोणासी पै नाही ॥६८॥
अर्जुनाची गदा सुटली । ते राक्षसा उरीं बैसली ।
तेणे नाही पावला भुली । पराक्रमी राक्षस ॥६९॥
राक्षसाच्या गदाघातें । खेद न होय अर्जुनातें ।
दोघे समान वीर तेथे । कोणी कोणातें गणी ना ॥७०॥
पूर्वी बळी आणि सुरेंद्रातें । युद्ध झाले आवेशें बहुते ।
कोण न पवेचि जयाते । विजय दोघांते पै नाही ॥७१॥
जैसे वृषभ शृंगेकरीं । भिडताति परस्परी ।
गज जैसे दंतकरीं । मारिती एकमेकांतें ॥७२॥
एक राक्षस लंकेश्वर । दुजा तो हैहयाधीश वीर ।
युद्ध करिती घोरांदर । स्वर्गी सुरवर पाहती ॥७३॥
तंव अर्जुनें काय केले । हेममय गदेतें मोकलिले ।
रावणाचे मस्तक भेदिले । वरदबळें भुली न पवे ॥७४॥
वज्रापरीस कठिण भारी । लागली रावणाचे शिरी ।
गदा चूर्ण होवोनि पृथ्वीवरी । पडोनि शतभग्न जहली ॥७५॥
अर्जुनाचे गदेकरुन । किंचित विव्हळ झाला दशानन ।
मागे सरला धनुष्यप्रमाण । तंव नृपराजें जाणीतलें ॥७६॥

अर्जुनाने रावणाला हजार हातांनी पकडले :

सहस्त्रभुजांचे बळेंकरीं । अर्जुने धरिला विबुधारी ।
जैसा विनतातनयो आपुले वैरी । निजसामर्थ्ये कवळीतसे ॥७७॥
पंचद्वयशतभुज । ऐसा तो हैहयाधिराज ।
गळा बांधी पौलस्त्यात्मज । जेविं बळीनें नारायण ॥७८॥
दशग्रीवा गळा बांधोन । स्वर्गी देखोनि सुरगण ।
म्हणति भला भला ह अर्जुन । मंगळ शब्द बोलती ॥७९॥
मद करोनि पुष्पवृष्टी । स्वर्गी देव आनंदकोटी ।
म्हणती धन्य धन्य हा क्षत्रिय सृष्टी । क्षात्रधर्मे आगळा ॥८०॥
अर्जुनें रावण कैसा धरिला । जैसा बळींने विष्णु द्वारपाळ केला ।
तैसा गळा बांधोनि परतला । आला आपुलिया नगरीसीं ॥८१॥
गर्जना करोनि अर्जुन । रावणातें गळा बांधोन ।
जैसा पारधियानें श्वान । तैसा दशानन पै नेला ॥८२॥
प्रहस्त रणी पडिला होता । तो पावोनि स्वस्थता ।
चहूंकडे अवलोकी लंकानाथा । तंव अर्जुनें गळा बांधिलासे ॥८३॥

प्रहस्तादि राक्षसांचा पराभव करुन अर्जुन
रावणाला आपल्या नगरी घेऊन आला :

देखोनि रावणा गळबंधन । प्रहस्तादि राक्षस मिळोन ।
क्रोधे संग्राम दारुण । करिते झाले रायासीं ॥८४॥
म्हणती अर्जुना भूपती । रावण गळा बांधिला हे सुख चिती ।
न धरावें जाण युद्धाप्रती । धीर धरोनि रहावे ॥८५॥
राक्षस म्हणती मुसळ साहें । पळो नको उभा राहे ।
आता तुज कोण राखेल माये । वल्गोनिया गर्जती ॥८६॥
तव अर्जुनें काय केले । रणी राक्षसा मारिले ।
कित्येक ते पळोनि गेले । घायवट होवोनी ॥८७॥
रणी राक्षसमोड झाला । कार्तवीर्य जयो पावला ।
देवी पुष्पवर्षाव केला । भाट गर्जती पवाडे ॥८८॥
मारुनिया दैत्यांसी । इंद्र पावे जयासी ।
तैसे राजेंद्रें त्या समयासी । राक्षसांतें जिंतिले ॥८९॥
अर्जुन झाला जयवंत । गळा बांधोनि लंकानाथ ।
सवे घेवोनि प्रधान समस्त । पुरी प्रवेशला आपले ॥९०॥
बळीस जिंतोनि शचीपती । नगर प्रवेशे अमरावती ।
तैसे राये जिणोनि लंकापती । आपले नगरी प्रवेशला ॥९१॥
पुढिलें प्रसंगीं निरुपण । पौलस्ति येवोनि सोडवील रावण ।
श्रोती होवोनि सावधान । श्रवण कीजे कथेतें ॥९२॥
एका जनार्दनी करी विनंती । पुढील कथा परिसिजे संतीं ।
जिचेनि श्रवणें अघें नसती । स्वानंदस्थिती पाविजे ॥९३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणबंधन नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥२१॥ ओंव्या ॥९३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग