॥ श्रीएकनाथमहाराजकृत
39.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय एकूणचाळिसावा ॥
वानर-राक्षसांना आनंद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीराम सच्चिदानंदघन । लीलावतार परम पावन ।
खेळ खेळे विचित्र विंदान । विधात्या महिमान न कळे ज्याचे ॥१॥
ऐसा तो रघुपती । भद्रासनीं अयोध्येप्रती ।
बैसला जैसा नक्षत्रे भोवतीं । मध्ये चंद्र विराजे ॥२॥
भोवते राजे तपोधन । तेणे सभा प्रसन्नवदन ।
बंदीजन करिती गुणवर्धन । गंधर्व गायन करिताती ॥३॥
तदनंतर पूर्वी भरतें । राजे बोलाविले होते रणसाह्यार्थे ।
ते विनविते झाले रघुपतीतें । स्वदेशातें जावया ॥४॥
श्रीराम म्हणे रायांसी । तुम्हांसि भरतें रणसाह्यासी ।
पाचारिलें परी तुमच्या प्रसादेंसी । आधींच रावण मारिला ॥५॥
तरी आता स्वदेशा जावे । मज मनी आठवावे ।
म्हणोनि प्रीतिपूर्वक गौरवें । राजयांची पूजा केली ॥६॥
ऐशी करोनिया पूजा । तृपां श्रीराम बोले वोजा ।
तरी आता शीघ्र स्वदेशा जा । आनंदनिर्भर होवोनी ॥७॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । समस्तीं राजीं मिळोन ।
श्रीरघुपतीस करोनि वाम प्रदक्षिण । स्वराष्ट्रातें निघाले ॥८॥
मार्गी करिती अनुवादातें । म्हणती व्यर्थ बोलाविलें भरते ।
पूर्वी कार्य केले श्रीरघुनाथें । मग अयोध्येते आम्ही गेलों ॥९॥
भरत आम्ही सहपरिवारी । पुढे जावे लंकेवरी ।
तंव श्रीराम-लक्ष्मण मारोनि वैरी । अयोध्येभीतरीं पै आले ॥१०॥
आमुचे आगमन वृथा झाले । परी रघुनाथे आम्हा सन्मानिले ।
ऐसे म्हणत म्हाणता पावले । आपुल्याला नगरांतें ॥११॥
तंव येरीकडे भरतलक्ष्मण । राया बोळवोनि स्वस्थानीं जाण ।
मग प्रवेशते झाले अयोध्याभवन । बहुविध धन आणोनी ॥१२॥
भरत-लक्ष्मणानी आणलेले धन रामांनी
वानर-राक्षसांना वाटून त्यांना संतुष्ट केले :
रायी श्रीरामाकारणें । पाठविलीं नानापरींचीं भूषणे ।
अश्व रथ गज गोधनें । नाना उष्ट्रे पाठविली ॥१३॥
शेळियांचें उदंड कळप । नाना व्याघ्र हरिणें सर्प ।
नाना जातींचे पक्षी अमूप । श्रीराम सुखरुप व्हावया ॥१४॥
चंदन पारिजात केशरपरिमळ । नानापरींचीं परिमळें बहळ ।
दिव्य वस्त्रे सुपरिमळ । श्रीरामासी दिधली ॥१५॥
ऐसे रायाचे बळिदान । घेवोनि आले भरत लक्ष्मण ।
प्रवेशले अयोध्याभवन । जेथे परब्रह्म आपण असे ॥१६॥
श्रीरामा जाणविली मात । स्वामी आले लक्ष्मणभरत ।
राजयांचे भेटींसहित । तुमच्या दर्शना येताती ॥१७॥
इतुके बोलता ते समयी । रत्नाभरणेंसीं ते सभाठायीं ।
आले दोघे बंधु पाही । श्रीरामासी भेटले ॥१८॥
श्रीरामे देवोनि आलिंगन । पुढे ठेविले राजयांचें धन ।
ते श्रीरामे समस्त देखोन । वांटिता झाला ते समयी ॥१९॥
सुग्रीवादि करोनि वानर । बिभीषणासहित निशाचर ।
श्रीरामे केले अभर । रत्नालंकार देवोनी ॥२०॥
दिधली समस्ता ऋक्षांप्रती । संतुष्ट केल्या वानरपंक्तीं ।
एकी आभरणे बांधोनी हाती । एकी गळा बांधिलीं ॥२१॥
एक मस्तकी हिरे खोंवती । एक करी मुद्रा घालिती ।
एक ते दिव्याभरणें वेढिती । एक गाती नाचती श्रीरामापुढें ॥२२॥
एक श्रीरामापुढें पिलंगती । एक श्रीरामा वाकुल्या दाविती ।
एक ते कुसी खांजविती । दंत विचकती श्रीरामापुढें ॥२३॥
ऐसे संतुष्ट ऋक्ष वानर । श्रीरामापुढें करिती गजर ।
ते देखोनि श्रीरामचंद्र । आनंदें थोर डुलतसे ॥२४॥
एके परिमळद्रव्य घेवोनि हाती । एकमेकांतें लाविती ।
भोक्ता श्रीराम एक म्हणती । ग्रासोग्रासी वानर ॥२५।
ऐसे एक मासपर्यंत । सुखे वसते झाले अयोध्येआंत ।
युग घटिकेसमान जात । श्रीरघुनाथासन्निध ॥२६॥
ऐसा क्रमला प्रथम मास । दुसरा मास प्रवर्तला वानरांस ।
दिवसेंदिवस अति उल्हास । श्रीरामभक्तांस जातसे ॥२७॥
हृष्ट पुष्ट ऋक्ष वानर । आणि बिभीषणाचे रजनीचर ।
मागील विसरले गृह पुत्र दार । श्रीरघुवीर सेविता ॥२८॥
एका जनार्दना शरण । वानरेंशीं श्रीरघुनंदन ।
अयोध्येसी सुखसंपन्न । विराजमान पै असे ॥२९॥
पुढील कथा अति रसाळ जाण । वानरा-राक्षसांलागून ।
आज्ञा देईल रघुनंदन । स्वभवना जावया ॥३०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वानरराक्षससुखसंपनातानाम एकोनचत्वारिंशोध्यायः ॥३९॥ ओंव्या ॥३०॥
