जरि हा हो कृपा करिल
3165.
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हेचि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥
कोठोनिया काही न लगे आणावे । न लगे कोठे जावे तरावया ॥धृपद॥
जरी देव काही धरिल पै चित्ती । तरि हेचि होती दिव्य चक्षु ॥२॥
तुका म्हणे जरी देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाही ॥३॥
अर्थ :
जर हा नारायण माझ्यावर कृपा करील तरच मला ब्रम्हज्ञान प्राप्त होईल. कोठे काही आणण्यासाठी जावेही लागणार नाही व कोठून आणावेही लागणार नाही त्यामुळे या भवसागरातून तरुन जाण्यासाठी कोठे जावे देखील लागणार नाही. जर देवाने मनात आणलेच तर माझे सामान्य डोळे देखील दिव्य चक्षू होतील. तुकाराम महाराज म्हणतात, जर देवाने त्याचे नीजस्वरुप आपल्याला दाखवले तर जीवदशेचा बाद होईल व देहभावच नाहीसा होईल.
