वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 36. संस्कृत ग्रंथ › 1. सार्थ पंचदशी (विद्यारण्यतीर्थ) › २. पंचदशी परिच्छेद एकूण १५ › 3 तृतीयः परिच्छेदः - पञ्चकोशविवेकः

पञ्चदशी ॥

🙏 36. संस्कृत ग्रंथ · ABH-081112 · अभंग क्र. १

पञ्चदशी ॥
3 तृतीयः परिच्छेदः - पञ्चकोशविवेकः
गुहाहितं ब्रह्म यत्तत्पञ्चकोष विवेकतः ।
बोद्धुं शक्यं ततः कोषपञ्चकं प्रविविच्यते ॥१॥

अर्थ :
गुरु - "यो वेद निहितं गुहायां'' या श्रुतीने जे गुहेमध्ये असणारे ब्रह्म सांगितलें, ते पंचकोशांच्या विवेकाने समजण्याजोगे आहे. याकरितां आम्ही पंचकोशांचें विवेचन करून दाखवितों. ॥१॥

देहादभ्यन्तरः प्राणः प्राणादभ्यन्तरं मनः ।
ततः कर्ता ततो भोक्ता गुहा सेयं परम्परा ॥२॥

अर्थ :
शिष्य- श्रुतींनी जी गुहा सांगितली, ती कोणती ? गु०- या अन्नमय स्थूल देहाच्या आंत प्राण आहेत. प्राणांच्या आंतल्या बाजूस मन आहे. मनाच्याही आंतल्या बाजूस कर्ता म्हणजे विज्ञानमय कोश आहे. त्याच्याही आंत भोक्ता म्हणजे आनंदमय कोश आहे. अशी जी अन्नमयापासून आनंदमयापर्यंत परंपरा सांगितली त्या परंपरेस गुहा असे म्हणतात. ॥२॥

पितृभुक्तान्नजाद्वीर्याज्जातोऽन्नेनैव वर्धते ।
देहः सोऽन्नमयो नात्मा प्राक्चोर्ध्वं तदभावतः ॥३॥

अर्थ :
शिष्य- या प्रत्येक कोशाचे स्वरूप काय आहे, ते कृपा करून सांगा. गु०- जो देह आईबापांनी भक्षिलेलें जे अन्न त्यापासून तयार झालेल्या वीर्यापासून उत्पन्न झाला, तो अन्नभय कोश होय. हा कोश आत्मा म्हणता येत नाही. कारण, उत्पत्तीपूर्वी व मरणानंतर त्याचा अभाव आहे. जो पदार्थ कार्य आहे, तो पदार्थ नाशवंत आहे. देह हे कार्य असल्यामुळे त्याला अर्थातच नाश आहे. ॥३॥

पूर्वजन्मन्यसत्त्वे तज्जन्म सम्पादयेत्कथम् ।
भाविजन्मन्यसत्कर्म न भुञ्जीतेह संचितम् ॥४॥

अर्थ :
शिष्य- आपण सांगितलेला हेतु खरा आहे, त्या हेतूपासून जी गोष्ट आपण सिद्ध केली, ती मात्र संभवत नाही. म्हणून तो हेतु अप्रयोजक आहे, असे मला वाटते. कारण आपण देहाला जसे कार्यत्व लागू केले; तसे माझ्या मतें आत्म्यालाही कार्यत्वच येतें. तेव्हा देहालाच आत्मा म्हणण्यास कोणची हरकत आहे. ? गु०-आत्म्यास कार्यत्व लागू केले असता दोन दोष प्राप्त होतात. एक अकृताभ्यागम म्हणजे काही न करता परिणाम घडणे, आणि कृतप्रणाश म्हणजे केलेल्या कर्माचा कांहींच परिणाम न होता नाश होणें, ह्या दोन्ही गोष्टी असंभवनीय आहेत. कारण या देहास जर तू आत्मा म्हणतोस तर, हा देहात्मा पूर्वजन्मीं नव्हता, असे म्हणावें लागेल. आणि तसे समजल्यास या जन्माची प्राप्ति कशी होईल, म्हणून येथे अकृताभ्यागम दोष आला. तसेंच पुढील जन्मी हा देहरूप आत्मा नाही म्हटल्यास, आता केलेल्या पुण्यपापाचा फलभोग घेण्यास पुढे कोणी नसल्यामुळें कर्मक्षय होऊन कृतप्रणाश दोष येऊ पहातो. याकरितां आत्मा कशाचे तरी कार्य आहे, म्हणून अन्नमय कोश आत्मा नव्हे हे सिद्ध झाले. ॥४॥

पूर्णो देहे बलं यच्छन्नक्षाणां यः प्रवर्तकः ।
वायुः प्राणमयो नासावात्मा चैतन्यवर्जनात् ॥५॥

अर्थ :
शिष्य- बरें, हा अन्नभय कोश नसेल तर नसो; परंतु प्राणमय कोशास आत्मा म्हणण्यास कोणती हरकत आहे. ? गु०- अन्नमयाप्रमाणें प्राणमयालाही आत्मा म्हणता येत नाही. याचे तुला स्वरूप दाखवून नंतर अनात्मत्व सिद्ध करून दाखवतों. जो वायु देहाचेठायी आपादमस्तक व्याप्त असून व्यानरूपानें शरीरास सामर्थ्य देतो, व जो नेत्रादिक इंद्रियांचा प्रेरक आहे, त्या वायूस प्राणमय कोश असे म्हणतात. या कोशालाही आत्मा म्हणता येत नाही. कारण, याला चैतन्य म्हणजे ज्ञान मुळींच नाही. म्हणून हा जड आहे. याजकरितां काष्ठपाषाणादि पदार्थास आत्मा म्हणणे जसे योग्य नाही, तसे या प्राणमय कोशालाही आत्मा म्हणता येत नाही. ॥५॥

अहन्तां ममतां देहे गृहादौ च करोति यः ।
कामाद्यवस्थया भ्रान्तो नासावात्मा मनोमयः ॥६॥

अर्थ :
शिष्य- बरें, मनोमय कोशाला तरी आत्मा म्हणता येईल किंवा नाही ? मला तर असे वाटते की, मन हे प्राणाप्रमाणे जड नाही, म्हणून हेंच आत्मा आहे. गु०- त्याचेंही स्वरूप तुला सांगतो. म्हणजे पूर्वोक्त दोन कोशांप्रमाणे हा कोशही आत्मा नव्हे, हे तुझ्या ध्यानांत येईल. जो या देहाला मी मी म्हणतो व गृहादिकांला माझे माझे असे म्हणता, त्या कोशास मनोमय कोश असे म्हणतात. हाही आत्मा होऊं शकत नाही. कारण, हा कामक्रोधादिक वृत्तीचा बनला असल्यामुळे चंचल व अनियमित आहे, म्हणून यास आत्मा म्हणता येत नाही. ॥६॥

लीना सुप्तौ वपुर्बोधे व्याप्नुयादानखाग्रगा ।
चिच्छायोपेतधीर्नात्मा विज्ञानमयशब्दभाक् ॥७॥

अर्थ :
शिष्य- बरें, विज्ञानमय कोश तरी आत्मा होऊं शकेल की नाही ? गु०- त्याचेंही तुला लक्षण सांगतो. जी बुद्धि चिदाभासानें युक्त होऊन सुषुप्तींत लय पावते, आणि जागृतींत शरीरास नखशिखांत व्यापून रहाते, तिला विज्ञानमयकोश म्हणतात. हिला विलयादिक अवस्था असल्यामुळे आत्मा म्हणता येत नाही. ॥७॥

कर्तृत्वकरणत्वाभ्यां विक्रियेतान्तरिन्द्रियम् ।
विज्ञानमनसी अन्तर्बहिश्चैते परस्परम् ॥८॥

अर्थ :
शिष्य- मन आणि बुद्धि या दोनही अंतःकरणाच्याच अवस्था आहेत, तेव्हा मनोमय आणि विज्ञानमय अशा दोन कोशांची कल्पना न करता दोन्ही मिळून एकच कोश असे का मानले नाही ? गु०- याचे कारण हेंच की, दोन्ही जरी अंतःकरणाचींच रूपे आहेत, तरी कर्ता आणि कारण अशी दोन रूपे दोहींची भिन्न भिन्न असल्यामुळे एकाला विज्ञानमय आणि दुसर्‍याला मनोमय असे म्हटलें. एकच, अंतःकरण आत असतांना कर्ता असतो आणि तोच बाहेर आल्यावर मन होतें, म्हणून दोन कोशांची कल्पना जी केली, ती योग्यच आहे. ॥८॥

काचिदन्तर्मुखा वृत्तिरानन्दप्रतिबिम्बभाक् ।
पुण्यभोगे भोगशान्तौ निद्रारूपेण लीयते ॥९॥

अर्थ :
शिष्य- हे चारही कोश आत्मा नव्हे अशी माझ्या मनाची खात्री बरीच झाली. परंतु पांचवा जो आनंदमय कोश, ज्यास भोक्ता असे म्हणतात, तो मात्र आत्मा नव्हे असे कधी म्हणता येणार नाही गु०- त्याला देखील आत्मा म्हणता येत नाही. त्याचे तुला येथे लक्षण सांगतों, म्हणजे त्याचेंही अनात्मत्व तुझ्या लक्षांत येईल. पुण्यकर्माचे फल अनुभवित असता कोणी एक अंतःकरणाची वृत्ति अंतर्मुख होऊन तिजमध्ये आत्मस्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब पडतें, व तीच वृत्ति पुण्यभोग संपला म्हणजे निद्रारूपानें लय पावते. ॥९॥

कादाचित्कत्वतो नात्मा स्यादानन्दमयोऽप्ययम् ।
बिम्बभूतो य आनन्द आत्मासौ सर्वदा स्थितेः ॥१०॥

अर्थ :
गु०- या वृत्तीसच आनंदमयकोश असे म्हणतात. ही वृत्ति अमुक काळपर्यंत राहणारी आहे, म्हणून ही अनित्य आहे, तिला आत्मा कसें म्हणता येईल ? पण या वृत्तींत ज्याचे प्रतिबिंब पडले अशी जी एक बिंबभूत वस्तु, तिला आत्मा म्हणता येईल. कारण, ती सर्वदा सारखी राहणारी आहे. ॥१०॥

ननु देहमुपक्रम्य निद्रानन्दान्तवस्तुषु ।
माभूदात्मत्वमन्यस्तु न कश्चिदनुभूयते ॥११॥

अर्थ :
शिष्य- अन्नमयापासून आनंदमयापर्यंत सर्व पांचही कोश आत्मा नव्हे असे आपण सिद्ध करून दाखविले खरे, परंतु या पांच कोशांखेरीज सहावा कोणीच दिसत नाही, तेव्हा आपण जो आत्मा म्हणता, तो कोठे आहे ? ॥११॥

बाढं निद्रादयः सर्वेऽनुभूयन्ते न चेतरः ।
तथाप्येतेऽनुभूयन्ते येन तं को निवारयेत् ॥१२॥

अर्थ :
गु०-अरे, आनंदमयापासून अन्नमयापर्यंत पांचही कोश ज्याच्या अनुभवास आले, तोच आमचा आत्मा, तो नाही असे म्हणता येईल काय ? ॥१२॥

स्वयमेवानुभूतित्वात्विद्यते नानुभाव्यता ।
ज्ञातृज्ञानान्तराभावादज्ञेयो न त्वसत्तया ॥१३॥

अर्थ :
शिष्य- तुम्ही जो आत्मा सांगता तो जर खरोखर असता, तर आमच्या अनुभवास आला असता; ज्या अर्थीं अनुभवास येत नाही, त्या अर्थी तो नाहींच असे म्हटले पाहिजे. गु०- आम्ही जो पंच कोशांचा साक्षी सांगितला, तो स्वत: अनुरूपच असल्यामुळे तो अनुभवास विषय होऊं शकत नाही. याचे कारण असे आहे की, तेथे ज्ञाता व ज्ञान दोन्हींही नसल्यामुळे तो ज्ञानास विषय होत नाही, तथापि त्याचे अस्तित्व कोठे जाईल ? पूर्वोक्त पंचकोश ज्याच्या अनुभवास आले, तो साक्षी असलाच पाहिजे. याला एक दृष्टांत देतो, म्हणजे अनुभवरूप आत्म्याला अनुभवविषयत्व संभवत नाही हे तुला स्पष्टपणें समजून येईल. ॥१३॥

माधुर्यादिस्वभावानामन्यत्र स्वगुणार्पिणाम् ।
स्वस्मिंस्तदर्पणापेक्षा नो न चास्तान्यदर्पकम् ॥१४॥

अर्थ :
साखर व लिंबू यांसारखे जे स्वभावत: अनुक्रमे गोड व आंबट पदार्थ आहेत ते दुसर्‍या पिठासारख्या किंवा पाण्यासारख्या पदार्थांत मिश्र केले असता त्या पिठास किंवा पाण्यास गोडी किंवा आंबटपणा येतो. परंतु त्या साखरेस व लिंबास गोड किंवा आंबट करण्यास पिष्टादि पदार्थ समर्थ नाहींत. ॥१४॥

अर्पकान्तराराहित्येप्यस्त्येषां तत्स्वभावता ।
माभूत्तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते ॥१५॥

अर्थ :
कारण, ते स्वभावत: गोड व आंबट असल्यामुळे दुसर्‍या पदार्थांच्या मिश्रणाची त्यांस गरजच नाही. त्याप्रमाणे आत्मा हा अनुभवास विषय जरी न झाला, तरी स्वतःसिद्ध तो बोधरूप असल्यामुळे त्याचे अस्तित्व कधींही नाहीसे करता येणार नाही. यास श्रुतीचे प्रमाणही आहे. ॥१५॥

स्वयंज्योतिर्भवत्येष पुरोऽस्मात्भासतेऽखिलात् ।
तमेव भान्तमन्वेति तद्‌भासा भासते जगत् ॥१६॥

अर्थ :
हा पुरुष स्वयंज्योति आहे. सर्व विषयांच्या पूर्वी हा भासतो. असा जो भासमान आत्मा त्याला अनुसरूनच सर्व, जगत् भासतें म्हणून त्याच्या प्रकाशानेंच सर्व पदार्थ भासतात इत्यादि श्रुतिवाक्यें आत्म्याचे स्वप्रकाशत्व सुचवितात. ॥१६॥

येनेदं जानते सर्वं तं केनान्येन जानताम् ।
विज्ञातारं केन विद्याच्छक्तं वेद्ये तु साधनम् ॥१७॥

अर्थ :
आणखी दुसरीही अशींच प्रमाणे आहेत. जेणेंकरून हे सर्व जग जाणते त्या आत्म्याला जाणण्यास कोण समर्थ आहे ? अरे, हा जो सर्व जगाचा साक्षी याला कोण जाणू शकेल ? मनानें याला जाणता येईल अशी कोणी शंका घेईल, तर याजवर आमचें हेंच सांगणे की, आत्मा खेरीज करून बाकीच्या सर्व पदार्थांस जाणण्यास मात्र मन समर्थ आहे. परंतु मनाचाही साक्षी जो आत्मा त्याला जाणण्यास ते कधी समर्थ होणार नाही. ॥१७॥

स वेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता ।
विदिताविदिताभ्यां तत्पृथक्बोधस्वरूपकम् ॥१८॥

अर्थ :
तसेंच, आणखीही दोन प्रमाणे तुला सांगतो. "जे जाणण्यास. योग्य आहे, ते सर्व तो जाणतो.'' ''त्याला जाणणारा दुसरा कोणीच नाही. ते ब्रह्म ज्ञात पदार्थ आणि अज्ञात पदार्थ यांहून अगदी भिन्न असून केवळ बोधस्वरूप आहे.'' ॥१८॥

बोधेऽप्यनुभवो यस्य न कथंचन जायते ।
तं कथं बोधयेच्छास्त्रं लोष्टं नरसमाकृतिम् ॥१९॥

अर्थ :
शिष्य- ज्ञात आणि अज्ञात पदार्थांखेरीज बोध म्हणून जो तुम्ही म्हणता तो तरी अनुभवास कोठे येतो ? गु०- घटादिकाच्या बोधाविषयीं अनुभव प्रत्यक्ष होत असून जो मनुष्य तसा अनुभव नाही म्हणतो, त्याला मनुष्य तरी कसें म्हणावें ? तो केवळ मनुष्याच्या आकृतीचा पाषाणच आहे, असे म्हटले पाहिजे. अशा दगडाला शास्त्रानें बोध तरी कसा करावा ? ॥१९॥

जिह्वा मेऽस्ति न वेत्युक्तिर्लज्जायै केवलं यथा ।
न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृषी ॥२०॥

अर्थ :
अरे, मला जिव्हा आहे की नाही असे जर कोणी पुसेल, तर ते पुसणे केवळ लाजिरवाणे आहे. कारण, जिव्हेवांचून तसे पुसता कसे येईल ? त्याप्रमाणे बोधाचा मला अनुभव नाही असे म्हणणे देखील मूढपणाचें नव्हे काय ? शिष्य- बरें आपण म्हणता तसेंच का होईना. परंतु प्रस्तुत जे आमचें ब्रह्मज्ञानाचे बोलणे चाललें आहे, त्याची सिद्धता कशी झाली ? ॥२०॥

यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ।
यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत्येवं धीर्ब्रह्मनिश्चयः ॥२१॥

अर्थ :
गु०- अरे, या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचें ज्ञान होतें, त्या त्या पदार्थाची उपेक्षा करून बाकी राहिलेलें जे केवळ ज्ञान तेंच ब्रह्म व असे जे पक्के समजणें त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ॥२१॥

पञ्चकोषपरित्यागे साक्षिबोधावशेषतः ।
स्वस्वरूपं स एव स्याच्छून्यत्वं तस्य दुर्घटम् ॥२२॥

अर्थ :
शिष्य- जर घटादिविषयांची उपेक्षा करून ब्रह्मनिश्वय करता येतो, तर पंचकोशविवेक जो तुझी सांगितला त्याचा उपयोग काय ? गु०- त्याचा उपयोग फार आहे; नाही कसा. ब्रह्माच्या प्रत्यग् रूपाच्या ज्ञानांवाचून संसारनिवृत्ति होत नाही; व तसे ज्ञान पंचकोशांच्या विवेकांवाचून होत नाही. याकरतां तो विवेक अवश्य आहे. अन्नमयादि पंचकोशांचा बुद्धीने त्याग करून बाकी राहिलेला जो त्याचा साक्षी, तोच स्वस्वरूप ब्रह्म आहे, तो जरी दिसत नाही तरी त्याचे अस्तिस्व नाहींसे करता येत नाही. म्हणून त्याला कोणच्याही रीतीने शून्यत्व संभवत नाही. ॥२२॥

अस्ति तावत्स्वयं नाम विवादाविषयत्वतः ।
स्वस्मिन्नपि विवादश्चेत्प्रतिवाद्यत्र को भवेत् ॥२३॥

अर्थ :
कारण स्वयं म्हणून कोणी तरी एक असलाच पाहिजे. त्याच्या अस्तित्वाविषयींच जर विवाद असेल तर तेथे प्रतिवादी कोणी व्हावें. ॥२३॥

स्वासत्त्वन्तु न कस्मैचिद्रोचते विभ्रमं विना ।
अतएव श्रुतिर्बाधं ब्रूते चासत्त्ववादिनः ॥२४॥

अर्थ :
शिष्य- आपलें नास्तित्व प्रतिपादन करणाराच येथे प्रतिवादी समजावा. गु०- आपण नाही, असे भ्रांतिष्टावांचून कोणीही कबूल करणार नाही, म्हणूनच श्रुतीनेंही असत्त्ववाद्यांचा निषेध केला. ॥२४॥

असद्ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेदसन् ।
अतोऽस्य माभूद्वेद्यत्व स्वसत्त्वन्त्वभ्युपेयताम् ॥२५॥

अर्थ :
शिष्य- ती श्रुति कोणती ? गु०- त्या श्रुतीचा अर्थ असा की, ''ब्रह्म नाही म्हणणारा आपणच नाही असे म्हणतो, असे होतें. कारण, आपलें स्वरूप ब्रह्मच आहे.'' याकरिता साक्षीला जरी वेद्यत्व नसलें, तरी त्याचे अस्तित्व म्हणून कबूल केले पाहिजे. ॥२५॥

कीदृक्तर्हीति चेत्पृच्छेदीदृक्ता नास्ति तत्र हि ।
यदनीदृगतादृक्च तत्स्वरूपं विनिश्चिनु ॥२६॥

अर्थ :
शिष्य- मग तर आत्मा कसा आहे तो कृपा करून सांगा. गु०- आत्मा अमुकच प्रकारचा आहे असे सांगतांच येत नाही. ''जो असाही नव्हे, व तसाही नव्हे तोच तुझा आत्मा.'' कारण जो पदार्थ ज्ञानाला विषय आहे, तोच पदार्थ असा किंवा तसा आहे असे सांगता येईल; परंतु आत्मा हा ज्ञानाला विषय मुळींच नाही; तेव्हा तो असा की तसा हे कसें सांगावे. ॥२६॥

अक्षाणां विषयस्त्वीदृक्परोक्षस्तादृगुच्यते ।
विषयो नाक्षविषयः स्वत्त्वान्नास्यपरोक्षता ॥२७॥

अर्थ :
शिष्य- आपल्या बोलण्याचा अभिप्राय नीट समजला नाही. तो स्पष्ट करून सांगा. गु०- घटादिक जे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ त्यांस आम्ही अशा प्रकारचे असे म्हणतों, व जे इंद्रियांआड असणारे पदार्थ त्यांस आम्ही तशा प्रकारचे असे म्हणतों. आता आत्मा हा इंद्रियांस विषयच नाही म्हणून तो असा (इदृश) असे म्हणता येत नाही, व तो स्वप्रकाश, स्वसंवेद्य असल्यामुळे तो तसा (तादृश) असेही म्हणता येत नाही. ॥२७॥

अवेद्योऽप्यपरोक्षोऽतः स्वप्रकाशो भवत्ययम् ।
सत्यं ज्ञानमनन्तं चेत्यस्तीह ब्रह्मलक्षणम् ॥२८॥

अर्थ :
या कारणास्तव आत्मा ज्ञानाला विषय नसून प्रत्यक्ष आहे. म्हणूनच तो स्वप्रकाश आहे. व ''सत्यं ज्ञानमनंतं'' या श्रुतीने जे ब्रह्माचे लक्षण सांगितले ते आत्म्यालाही लागू पडतें. कारण आत्माही सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत आहे असे विचाराअंतीं सिद्ध होतें. ॥२८॥

सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः ।
बाधः किंसाक्षिको ब्रूहि न त्वसाक्षिक इष्यते ॥२९॥

अर्थ :
शिष्य- ते कसें ? गु०- ज्याला बाध नाही तेंच सत्य. आत्मा सर्व जगाच्या अभावाचा साक्षी आहे, त्याच्या अभावाला पहाणारा कोणीच नाही, व पहाणारावांचून तदभाव स्वीकारणें बरोबर नाही. म्हणून आत्मवस्तूचा अभाव कधींही होत नाही असे म्हटले पाहिजे. सर्व जगाच्या अभावाचा अनुभव निद्रा, मूर्च्छा व समाधि या अवस्थांमध्ये सर्वांस आहेच. तसा साक्षीच्या अभावाचा अनुभव घेणारा कोणीही नाही, म्हणून आत्मा हा सत्य आहे हे सिद्ध झाले. ॥२९॥

अपनीतेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते वियत् ।
शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते यत्तदेव तत् ॥३०॥

अर्थ :
यास दृष्टांत. घरांतील सर्व मूर्त पदार्थ काढून टाकले असता जसें बाकी अमूर्त आकाश रहातें, त्याप्रमाणे आपणाव्यतिरिक्त जितके म्हणून देहेंद्रियादिक मूर्तामूर्त पदार्थ आहेत, त्यांचे ''नेतिनेति'' या श्रुतीने निराकरण करून बाकी जो बोधरूप साक्षी रहातो तोच बाधरहित सत्य आत्मा होय. ॥३०॥

सर्वबाधे न किंचिच्चेद्यन्न किंचित् तदेव तत् ।
भाषा एवात्र भिद्यन्ते निर्बाधं तावदस्ति हि ॥३१॥

अर्थ :
शिष्य- प्रतीतीस येणार्‍या सर्व पदार्थांचा निषेध केला असता बाकी कांहींच रहात नाही. मग बाकी जो रहातो तो आत्मा असे जे आपण म्हटले त्याचा अर्थ काय ? गु०- जे बाकी कांही रहात नाही म्हणतोस, तेंच आमचें ब्रह्म. कांही नाही म्हणणे व कांही आहे म्हणणे ह्यांत भाषेचा मात्र भेद आहे. येर्‍हवी वास्तविक पाहिले असता बाधरहित साक्षिचैतन्य आहेच आहे. ॥३१॥

अत एव श्रुतिर्बाध्यं बाधित्वा शेषयत्यदः ।
स एष नेति नेत्यात्मेत्यतद्व्यावृत्तिरूपतः ॥३२॥

अर्थ :
श्रुतीमध्येही असेंच सांगितले आहे. ''नेतिनेति'' या श्रुतीचा अर्थ असा आहे की, जे जे पदार्थ बुद्ध्यादिकांस गोचर म्हणून आहेत, ते ते जड असे समजून त्यांचे निराकरण करून बाकी राहिलेलें साक्षिचैतन्य जे निराकरण करण्यास अशक्य तेंच ब्रह्म होय. ॥३२॥

इदं रूपं तु यद्याव तत्त्यक्तुं शक्यतेऽखिलम् ।
अशक्यो ह्यनिदं रूपः स आत्मा बाधवर्जितः ॥३३॥

अर्थ :
शिष्य- "नेतिनेति'' या श्रुतीने बाधित होणारा पदार्थ कोणता व बाधित न होणारा पदार्थ कोणता ? गु०- जितके म्हणून हे हे अशा दर्शक नामास गोचर होणारे पदार्थ आहेत, त्यांचा निषेध करणे शक्य आहे. आणि जी वस्तु, ही अमुकच अशा रीतीनें दाखविता येत नाही; तिचा निषेध करणे अशक्य आहे, अशी वस्तु सर्वांचा साक्षी जो बाधवर्जित आत्मा तो एकच आहे. ॥३३॥

सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरोदितम् ।
स्वयमेवानुभूतित्वादित्यादिवचनैः स्फुटम् ॥३४॥

अर्थ :
याप्रमाणें ब्रह्माच्या लक्षणांत जे सत्यत्व सांगितले ते आत्म्यास कसे लागूं पडते ते येथे सिद्ध करून दाखविले. आत्म्याची ज्ञानरूपता तर ''स्वयमेवानुभूतित्वात्'' इत्यादि श्वोकांतील वाक्यांनी पूर्वीच सिद्ध केली आहे. शिष्य- सत्य आणि ज्ञान ही दोन लक्षणे आत्म्याचेठायी सिद्ध करून दाखविली खरी, परंतु अनंत हे लक्षण आत्म्यास लागू पडेल की नाही, याचाच मला मुळी संशय आहे. ॥३४॥

न व्यापित्वाद्देशतोऽन्तो नित्यत्वान्नापि कालतः ।
न वस्तुतोऽपि सर्वात्म्यादानन्त्यं ब्रह्मणि त्रिधा ॥३५॥

अर्थ :
गुरु०- ते कसे लागू पडत नाही ? अरे, ब्रह्म सर्वव्यापि असे श्रुतींत सांगितले आहे, यावरून अर्थातच त्याला देशपरिच्छेद नाही; ब्रह्म नित्य असे सांगितले आहे म्हणून त्यास कालपरिच्छेद नाही; अणि ब्रह्म सर्व जगाचा आत्मा असे सांगितले आहे म्हणून त्यास वस्तुपरिच्छेदही नाही. याप्रमाणे देशतः, कालतः व वस्तुतः ब्रह्मास अंत नाही असे झाले ॥३५॥

देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया ।
न देषादिकृतोऽन्तोऽस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटन्ततः ॥३६॥

अर्थ :
शिष्य- देश, काल आणि वस्तु ही तिन्ही प्रत्यक्ष असून त्यांचा परिच्छेद ब्रह्मास नाही असे कसे म्हणता ? गु०- असेनात बापडी. ती असलीं तरी मायाकल्पित मिथ्या असल्यामुळे त्यांपासून ब्रह्माच्या अनंतपणास मुळीच हानि नाही. म्हणून ब्रह्म अनंत आहे असे जे म्हटले ते अगदी योग्य आहे. ॥३६॥

सत्यं ज्ञानमनन्तं यद्ब्रह्म तद्वस्तु तस्य तत् ।
ईश्वरत्वन्तु जीवत्वमुपाधिद्वयकल्पितम् ॥३७॥

अर्थ :
शिष्य- अहो, ब्रह्माला जड जगताचा परिच्छेद नाही असे म्हटले तरी चेतनरूप जे जीव आणि ईश्वर त्यांचा तरी परिच्छेद असलाच पाहिजे. मग ब्रह्म अनंत आहे, हे म्हणणे कसे संभवेल. गु०- जे सत्यादि लक्षणांनीं युक्त असे ब्रह्म सांगितले तेवढे मात्र सत्य आहे. त्याजवर ईश्वरत्व आणि जीवत्व ही दोन्ही उपाधिकल्पित आहेत; म्हणून जड जगताप्रमाणें त्यांपासनूही ब्रह्मास परिच्छेद होत नाही ॥३७॥

शक्तिरस्त्यैश्वरी काचित्सर्ववस्तुनियामिका ।
आनन्दमयमारभ्य गूढा सर्वेषु वस्तुषु ॥३८॥

अर्थ :
शिष्य- त्या दोन्ही उपाधीची स्वरूपे कृपा करून सांगावी. गु०- पृथिव्यादि सर्व वस्तूंचे नियमन करणारी अशी कोणी एक ईश्वराची अनिर्वचनीय शक्ति आहे. शिष्य- तर मग ती का दिसत नाही. ? गु०- आनंदमयापासून सर्व ब्रह्मांडापर्यंत ती गुप्तरूपानें आहे म्हणून दिसत नाही. ॥३८॥

वस्तुधर्मा नियम्येरं शक्त्या नैव यदा तदा ।
अन्योन्यधर्मसांकर्याद्विप्लवेत जगत्खलु ॥३९॥

अर्थ :
शिष्य- ती जर दिसत नाही तर ती आहे असे तरी कसे म्हणावे ? गु०- ती जर नसेल तर पृथिव्यादि तत्त्वांचे जे काठिन्यादि धर्म त्यांची व्यवस्थाच लागणार नाही इतकेंच नव्हे, तर त्या धर्माचें परस्पर सांकर्य होऊन जगाची स्थितीच राहणार नाही. ॥३९॥

चिच्छायावेशतः शक्तिश्चेतनेव विभाति सा ।
तच्छक्त्युपाधिसंयोगाद्ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत् ॥४०॥

अर्थ :
शिष्य- परंतु ती जड आहे असे तुम्हीच म्हणता, मग ती जगाचें नियमन तरी कसे करील. गु०- ती जरी जड आहे तरी तिजमध्य ब्रह्माचे प्रतिबिंब पडल्यामुळे ती चेतनासारखी दिसते, म्हणून तिजमध्यें नियमन करण्याचे सामर्थ्यही संभवतें. या शक्तीच्या उपाधीचा संयोग झाल्यामुळे ब्रह्मालाच ईश्वरपणा आला. ॥४०॥

कोषोपाधिविवक्षायां याति ब्रह्मैव जीवताम् ।
पिता पितामहश्चैकः पुत्रपौत्रौ यथा प्रति ॥४१॥

अर्थ :
आणि पूर्वी सांगितलेल्या कोशांच्या उपाधीमुळे ब्रह्मालाच जीवपणा आला. शिष्य- अहो पण एकाच ब्रह्माला जीवत्व आणि ईश्वरत्व हे विरुद्ध धर्म कसे आले ? गु०- जसा एकच मनुष्य पुत्राच्या विवक्षेने पिता होतो, आणि नातवाच्या विवक्षेने पितामह म्हणजे आजा होतो; त्याप्रमाणे एकच ब्रह्म कोशविवक्षेनें जीव होतें, आणि मायेच्या विवक्षेने ईश्वर होतें. ॥४१॥

पुत्रादेरविवक्षायां न पिता न पितामहः ।
तद्वन्नेशो नापि जीवः शक्तिकोषाविवक्षणे ॥४२॥

अर्थ :
परंतु पुत्र आणि नातु यांची विवक्षा न घेतल्यास जसा बापही नाही व आजाही नाही, त्याप्रमाणे माया व कोश यांची विवक्षा न केली तर ईश्वरही नाही व जीवही नाही. ॥४२॥

य एवं ब्रह्म वेदैष ब्रह्मैव भवति स्वयम् ।
ब्रह्मणो नास्ति जन्मातः पुनरेष न जायते ॥४३॥

अर्थ :
इति पञ्चकोषोविवेकोनाम तृतीयः परिच्छेदः ॥३॥

अर्थ :
या रीतीनें जो ब्रह्म जाणतो तो स्वत: ब्रह्मच होतो. आता ज्या अर्थी ब्रह्माला जन्म नाही, त्या अर्थीं त्यालाही पुनजर्न्म नाही हे सिद्ध झाले. ॥४३॥

अर्थ :

इति पंचकोशविवेकः समाप्तः ।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग