वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ४. किष्किंधाकाण्ड - अध्याय १८ › १६. हनुमानाचे महासागरावर उड्डाण

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088105 · अभंग क्र. १६

16.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

किष्किंधाकांड

॥ सोळावा ॥
संपातीचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

फळांनी व पाण्याने वानरांची तृप्ती :

वानरा मास उपोषण । तापसी फळे आणूनि पूर्ण ।
दिधले यावृत्तृप्ति भोजन । वानरगण उल्लासी ॥१॥

संतृप्तास्ते फलैर्मूलैः संजाताः शीतवारिणा ।
बलवीर्याश्च ते सर्वे तत्रासन्हरिपूगवाः ॥१॥
अपतन्सर्व एवैते दिशो वानरयूथपाः ॥२॥

भक्षितां पै फळमूळ । सेविता निर्मळ जळ ।
वानर सुखी जाले सकळ । हर्ष प्रबळ तृप्तीचा ॥२॥
वानरांचे सकळ दळ । पूर्विल्यापरिस अति प्रबळ ।
शतगुणें वाढलें बळ । जनकबाळ शोधावया ॥३॥

यानंतर सर्व वानरांची परत जाण्याची इच्छा :

वानर म्हणती हनुमंतासी । येथे काय फळे खावया आलासी ।
किंवा सीता शोधावयासी । त्या रामकार्यासी साधावें ॥४॥
शोधिता या विवराआंत । सीता न लभेचि निश्चित ।
पुढील सांग कर्तव्यार्थ । दक्षिणपंथ शोधावया ॥५॥
रविशशिविरहित । नित्य प्रकाश विवरांत ।
वानर दशदिशा पाहात । दक्षिणपंथ दिसेना ॥६॥
पूर्व कोण पश्चिम कोण । न कळे उत्तर दक्षिण ।
न कळे दशदिशांचे ज्ञान । केउते गमन करावे ॥७॥

अथ तानव्रवीत्सर्वान्विश्रांतान्हरिपुंगवान् ।
कि कार्यं कस्य वा हेतोः कान्ताराणि प्रपद्य च ॥३॥
इंद वचनमेकाग्रा तापसी धर्मचारिणी ।
यदि चैतन्मया श्राव्यं श्रोतुमिच्छामि तां कथम् ॥४॥

तापसीच्या प्रश्नावरुन कार्याविषयी निवेदन :

अत्यंत भार ज्याचे माथा । का जो त्वरेनें धावतां ।
अतिशयेंसीं उन्मत्तता । कथा वार्ता नये पुसों ॥८॥
जो का ज्ञानगर्वे पीडित । जो विषयमदें उद्धत ।
जो जो अतिशय क्षुधित । त्यासी वृत्तांत पुसों नये ॥९॥
तापसी म्हणे वानरनाथा । वार्ता पुसों नये क्षुधिता ।
फळभोजन सावधानता । सांगे वृत्तांता मनींच्या ॥१०॥
विवर गूढ अति कांतार । मिळोनि आले वानरभार ।
येथे का आलेती सकळ वीर । तोही विचार मज सांगा ॥११॥
तुम्ही श्रीरामाचे भक्त । माझेनि भाग्ये आलेती येथ ।
विवरी प्रवेशावया गुप्त । कोण कार्यार्थ मज सांगा ॥१२॥
मी तवं तुमची केवळ दासी । कार्या सांगों ये मजपासीं ।
ऐसे मानिलिया तुम्हांसी । तरी कार्यासी मज सांगा ॥१३॥

तस्यास्तद्वचनं श्रुत्वां हनूमान्मारुतात्मजः ।
आर्जवेन यथातत्वमाख्यातुमुपचक्रमे ॥५॥

ऐक तापसी पूर्ववृत्तांत । पूर्ण ब्रह्मा श्रीरघुनाथ ।
अवतरला सूर्यवंशाआंत । कौसल्यासुत दाशरथी ॥१४॥
पित्राज्ञेच्या निजनेटीं । बंधु सौमित्र सीता गोरटी ।
श्रीराम वनवासी पंचवटीं । गंगातटीं रहिवास ॥१५॥
रामलक्ष्मण गेले मृगापाठी । मागे शून्य पंचवटी ।
भिक्षुरुपें रावण कपटी । सीता गोरटी चोरिली ॥१६॥
तिचे करावया शोधन । किष्किंधे आला रघुनंदन ।
वाळी भ्रातृभार्याहरण । विंधोनि बाण मारिला ॥१७॥
राज्य दिधले सुग्रीवासी । य़ौवराज्य अंगदासी ।
सुग्रीवे धाडिलें आम्हांसी । सीताशुद्धीसी दक्षिणे ॥१८॥
दक्षिण शोधिली शतावर्तीं । शुद्धि न लभेचि सीता सती ।
सीताशोधनशुद्ध्यर्थीं । विवराप्रती आम्ही आलो ॥१९॥
सुग्रीवाज्ञा अति दारुण । मासा यावे शुद्धि करुन ।
न ये तया रासभरोहण । विटंबन अपमानें ॥२०॥
विवरी करिंता प्रवेशन । मास एक लोटला संपूर्ण।
विवर दुर्गम गहन । निर्गमन दिसेना ॥२१॥
बिळी करिता प्रवेशन । आम्ही जालो मूर्च्छापन्न ।
कैसेंनि येथे आगमन । हेंही ज्ञान आम्हा नाही ॥२२॥
विवरींचे अभिनव चिन्ह । न कळे उत्तर दक्षिण ।
न कळे पूर्वपश्चिमभान । केउते गमन करावे ॥२३॥
आमची आगती निर्गती । आम्हांसी न कळे निश्चिती ।
तुजअधीन आमची गती । कृपामूर्ति कृपा करी ॥२४॥

विवराबाहेर जाण्याची उत्कंठा :

आमची विवराबाहेर गती । आम्हांसी भेटे सीता सती ।
ऐसी कृपा करी शीघ्रगती । वानरपंक्ती उद्धरी ॥२५॥
ऐसे ऐकता वचन । तापसी जाली सुप्रसन्न ।
विवरीचें गमानागमन । नेणती सज्ञान द्विजदेव ॥२६॥
ब्रह्मयाची वरदोक्ती । विवरी अलियांची नव्हे निर्गती ।
बाहेर या विवराप्रती । यावया युक्ती लक्षेना ॥२७॥
मज ब्रह्मा सुप्रसन्न । विवरींचे गमनागमन ।
करावया मी सज्ञान । हे वरदान ब्रह्मयाचें ॥२८॥
ज्यासी श्रीरामाची भक्ती । दुर्गमी त्यासी निर्गती ।
रामनामप्रतापशक्ती । भवनिर्मुक्ति हरिभक्तलां ॥२९॥
श्रीरामनांचेनि कैवाडें । कळिकाळ पळती पुढे ।
विवर कायसे बापुडे । तुम्हा सांकडे बाधावया ॥३०॥
श्रीरामसेवा नित्यकर्म । हृदयी श्रीरामाचे प्रेम ।
नित्य मुखी श्रीरामनाम । सर्वत्र सुगम गति त्यांसी ॥३१॥
पैल हनुमंतादि वीर । भक्तिप्रतापें प्रताप थोर ।
श्रीरामनामाचे गुणगंभीर । येणे उद्धार वानरांसी ॥३२॥
आजि माझे सफळ अनुष्ठान । होता हनुमंतदर्शन ।
मी जाले सुखसंपन्न । महिमा गहन सत्संगें ॥३३॥
जप तप ध्यानस्थिती । अवघी सार्थक सत्संगती ।
त्या सत्संगाची अगाध कीर्ती । भवनिर्मुक्ति सत्संगें ॥३४॥

त्या तापसीच्या सांगण्यावरुन सर्व वानरांनी डोळे झाकले :

श्रीरामभक्तांच्या पंक्ती । आलेती माझिया भाग्यगती ।
सेवा करीन यशाशक्ती । बिलनिर्मुक्ती वानरा ॥३५॥

सर्वानेव बिलादस्मात्तारयिष्यामि वानरान् ।
निमीलयत चक्षूंषि सर्वे वानरपुंगवाः ॥६॥

बिळाबाहेर निर्गती । व्हावया वानरा समस्तीं ।
डोळे झांकावे निजहस्ती । माझ्या वचनोक्तीं विश्वासा ॥३६॥
डोळे उघडें असता । देव दानव ऋषिमहंतां ।
विवराबाहेर निर्गमता । कदा कल्पांता घडेना ॥३७॥
ऐकोनि तापसीचें वचन । वानरी आपलाले आपण ।
निजकरीं झांकोनि नयन । सावधान निर्गमार्थी ॥३८॥
वानरी झांकोनियां डोळे । मुहूर्त एक उभे ठेले ।
उघडा ऐसे कोणी न बोले । मग पाहू लागले उघडोनि ॥३९।

निमेषोत्तरमात्रेण बिलादुत्तरितास्तया ।
ततस्ते दद्दशुर्घोरं समुद्रं वरणालयम् ॥७॥
अपारममिगर्जंतं घोरैरुर्मिभिराकुलम् ।
मयस्य मायाविहितं गिरिदुर्गं विचिन्वताम् ॥८॥
तेषां मासो व्यतोक्रांतो यो राज्ञा समयः कृतः ॥९॥

नेत्र उघडल्यावर समोर विशाल समुद्र :

वानरी उघडोनिंया नेत्र । पाहती तंव पुढे समुद्र ।
अतिशयेंसी दुर्धर । गर्जें घोर गडगडां ॥४०॥
पुढे देखोनि समुद्र । विस्मयो करिती वानर ।
येथे कैसेनि आलो समग्र । केले विचित्र तापसियें ॥४१॥
नाही चालविलें धरोनि करी । नाही घेतलें कडेवरी ।
आम्हांसी विवराबाहेरी । कैसेपरी आणिले ॥४२॥
पुच्छी बांधोनि समस्त । हनुमंते नेलें विवरांत ।
तैसेंहि नाही केले येथ । न हालत आणिले ॥४३॥

शोध करतात तो तापसी व विवर अदृश्य :

येव्हढें लाघव जीपासीं । केउती आहे ती तापसी ।
पाहता न दिसे चौपासी । वानरांसी अति विस्मय ॥४४॥
अति आवेशें वानरवीर । वन शोधिता समग्र ।
ना तापसी ना ते विवर । विस्मय थोर वानरा ॥४५॥
निरसावया वानरभ्रांती । तापसी नव्हे ती श्रीरामशक्ती ।
कृपेने आली विवराप्रती । वानरपंक्ती तारावया ॥४६॥
मयमायेच्या मायिकशक्तीं । विवरी वानरा अति भ्रांती ।
रामानामाच्या आवर्ती । विवरनिर्मुक्ति वानरा ॥४७॥
करिता श्रीरामाची भक्ती । भक्ता बांधूं न शके भ्रांती ।
रामानामाचिये ख्याती । विवरोन्मुक्ति वानरा ॥४८॥
श्रीरामाच्या नामभेणे । माया पळे घेवोनि प्राणे ।
स्थिर बापुडे ते कोणे । भक्तजन भुलवावया ॥४९॥
क्षुधार्थे हनुमंताची भक्ती । तापसी पावली नित्यमुक्ती ।
यालागी हरिभक्तसंगती । भवनिर्मुक्ती भाविकां ॥५०॥
तापसी तरली वानू किती । रामानामाच्या आवर्तीं ।
वानरी विवरी केली ख्याती । सावधानवृत्तीं अवधारा ॥५१॥
नामे गर्जती वानरा । नामे कोंदलेसें विवर ।
तेणे जाला विवरोद्धार । जगदुद्धार रामानामे ॥५२॥
भक्त ज्या ठायासी जाती । तो ठाव नित्यमुक्ती ।
रामनामच्या आवर्तीं । उद्धरती जड जीव ॥५३॥
वनी वानर पाहती । नामे विवरा नित्यमुक्ती ।
वानरा विवराची अप्राप्ती । जड उद्धरती रामानामे ॥५४॥
यापरी ते वानर । करोनि विवराचा उद्धार ।
स्वये पावले समुद्रतीर । सीता सुंदर शोधावया ॥५५॥
मागे शोधिलें गिरीगव्हर । तेथे न लभेचि सीता सुंदर ।
पुढे ओढवला समुद्र । अति दुस्तर वानरा ॥५६॥

एक महिन्याचा अवधी संपला, परत जाऊन सुग्रीवाचा
अवमान होईल म्हणून तेथेच बसून प्रायोपवेशन :

सुग्रींवें केली मासावधी । ते लोटली विवरामधीं ।
तेथेंही न लभे सीताशुद्धी । कार्यविधि नव्हेचि ॥५७॥
सीताशुद्धि न होता पूर्ण । आम्हांसी जाता परतोन ।
सुग्रीव करील अपमान । आज्ञाल्लंघन रायाचे ॥५८॥

नरेंद्रेणाभिषिक्तोस्मि रामेणाक्लिष्टकर्मणा ।
स पूर्वं बद्धवैरो मां राजा द्दष्टवा व्यतिक्रमम् ॥१०॥
घातयिष्यति दंडेन तीक्ष्णेन कृतनिश्चयः ।
इहैव प्रायमाशिष्ये रम्ये सागररोधसि ॥११॥

सीताशुद्धीलागीं जाण । शतधा शोधली दक्षिण ।
पुढे समुद्र अति दारुण । गतिगमन खुंटले ॥५९॥
पुढे गति खुंटली उदधीं । आता न लभे सीताशुद्धी ।
मागे जावों नये त्रिशुद्धी । प्राणावधि वानरा ॥६०॥
ऐसे वोलोनि अंगद । दुःखे दुर्धर करी खेद ।
अवश्य मज करील विरोध । तोही संबंध अवधारा ॥६१॥
युवराजा तू त्रिशुद्धी । तुजअधिन वानरमांदी ।
म करितांचि सीताशुद्धी । मजचि आधी दंडील ॥६२॥
थोर करील अवकळा । रासभारोहण मुख्य तो सोहळा ।
उपानहमाळा गळा । गोमयगोळा अभिषेक ॥६३॥
सोसितां अवकळा दारुण । लोकलज्जा येईल मरण ।
यापरीस येथे आपण । द्यावा प्राण ते श्रेष्ठ ॥६४॥
सीताशुद्धि न होता दृढ । मुख्यत्वें माझी न राखे भीड ।
इतरांचा कोण पाड । दुःख दुर्वाड वानरा प्राण रणरंगीं ॥६६॥
ऐकोनि अंगदाची गोष्टी । वानरी भया घेतले पोटी ।
प्राण त्यजावा सिंधुतटीं । अवकळा मोठी कोण सोसी ॥६७॥
देहलोभे वांचों जाता । अवकळा बैसेल माथा ।
रामस्मरणे प्राण जाता । परमार्था पावेन ॥६८॥
यालागी आम्ही अवघे जणें । अश्वमेव प्राण देणे ।
घालोनिया कुशास्तरणें । मरणा धरणे बैसलें ॥६९॥

उपविष्टास्तु ते सर्वे यस्मिन्प्रायं गिरिस्थले ।
हस्यो गृध्रराजस्य तं देशमुपचक्रमुः ॥१२॥

समुद्रतीरावर बसले असता संपातीची भेट संपातीचा त्यांना प्रश्न :

तृण घालोनि मुष्टिमुष्टी । प्रायोपवेशें समुद्रतटीं ।
वानर पडता कोट्यनुकोटीं । देखिले दृष्टी संपातीनें ॥७०॥
जे जे आले समुद्रतीरा । तो तो संपातीचा चारा ।
वेगी भक्षावया वानरा । संपाटी त्वरा तेथे आला ॥७१॥
तो बहुता दिवसांचा उपवासी । देवे कृपा केली कैसी ।
मज भक्षावया वानरांसी । या ठायासी आणिले ॥७२॥
संपाती पुसे स्वये आपण । या ठाया जे आले जाण ।
माझे भक्ष्य त्यांसी मरण । तुम्ही येथे कोण कोणाचे ॥७३॥
तृणास्तरणीं समुद्रतटीं । वानरांच्या कोट्यनुकोटी ।
पडोनि करिती श्रीरामाच्या गोष्टी । नाही पोटी मरणभय ॥७४॥
माझेनि अति उग्र दर्शने । प्राणियांते प्राणांत पळलें ।
तुम्ही गजबजाना मनें । मरणा धरणे का बैसलेती ॥७५॥
तुम्ही काय मरों टेंकलेती । जे या ठाया आणिलेती ।
ते माझे भोजनप्रयुक्तीं । वानरपंक्ती मराल ॥७६॥
करिता रामनामचावटी । सांगा श्रीराम कोण तो सृष्टी ।
तुम्हांसी कोठे जाली भेटी । समूळ गोष्टी मज सांगा ॥७७॥
अंगदाकडून उत्तर, वृत्तांन्तकथन व स्वयंदानः
ऐकोनि संपातींचे वचन । अंगद म्हणे आम्ही धन्य ।
अनायासें आले मरण । गृध्रभक्षण वानर ॥७८॥
अन्नोदके त्यजून प्राण । चरफडोनी द्यावा जाण ।
श्रीरामे कृपा केली पूर्ण । आले मरण अनायासें ॥७९॥
अंगद म्हणे संपातीसी श्रीरामकथा का पुससी ।
तू आजि अतिथ आम्हांसी । वानरांसी सुखे भक्षीं ॥८०॥
क्षुधितांसी द्यावे अन्नदान । हे तंव शास्र सनातन ।
आम्ही तुज दिधले देहदान । करी भक्षण वानरा ॥८१॥

वृत्तान्त ऐकून संपातीचे हृदयपरिवर्तन, रामनामाचा महिमा,
रामांचा व वानरांचा संबंध संपाती विचारतो :

संपाती बोले आपण । तुम्ही करिता रामस्मरण ।
माझेनि न करावे भक्षण । नाम रक्षण भक्तांसी ॥८२॥
जेथे रामनामस्मरण । तेथे रिघो न शके मरण ।
माझेनि न करवे भक्षण । नाम रक्षण निजभक्ता ॥८३॥
रामनामाचिया स्मरणी । जन्ममरणां महापळणी ।
श्रीरामभक्त तुम्ही निर्वाणीं । भाग्ये माझ्या आलेती ॥८४॥
मुखी रामानामावृत्ती । हृदयी श्रीरामाची प्रीती ।
देह विकिले श्रीरामभक्ती । भाग्य किती मी वानू ॥८५॥
अतिथीचे निजभोजनीं । तुम्ही समस्त देहदानी ।
श्रीरामभाग्यें सभाग्य जनी । धन्य त्रिभुवनी तुम्ही एक ॥८६॥
कोण कार्याचिये विधीं । तुम्ही आलेती सभाग्यनिधी ।
ते मज सांगावे त्रिशुद्धी । कार्यसिद्धी मी करीन ॥८७॥
अत्यंत आवडी माझे पोटी । ते मी पुसेन गुह्यगोष्टी ।
तुम्ही श्रीराम देखिला दृष्टी । कैसेनि भेटी श्रीरामी ॥८८॥
श्रीराम राजा ईश्वरेश्वर । तुम्ही वनचरें वानर ।
कैसेनि रामभजनीं तत्पर । सविस्तर मज सांगा ॥८९॥

वानरांना आश्चर्य, हनुमंताचा प्रश्न :

ऐकोनि संपातींचे वचन । वानर जाले विस्मयापन्न ।
करिता रामनामस्मरण । गीध भक्षण करू न शके ॥९०॥
जे आले या समुद्रतीरा । तो तो संपातीचा चारा ।
त्यासी भक्षवेना वानरा । श्रीरामचंद्राचेनि नामे ॥९१॥
करिता रामनामस्मरण । स्मरत्या मारुं न शके मरण ।
आम्ही अभागी संपूर्ण । रामस्मरण न करवे ॥९२॥
करिता नित्य नामस्मरण । मृत्यु त्याचे वंदी चरण ।
आम्हांसी प्रत्यक्ष प्रमाण । गिधा भक्षण न करवे ॥९३॥
मरण न ये रामनामोक्तीं । समुद्र बापुडे ते किती ।
नामस्मरणाची निजशक्ती । अपांपती आम्ही लंघूं ॥९४॥
धरोनि नामाचा निर्धार । आम्ही तरूं भवसागर ।
तेथे कायसा समुद्र । भाग्ये हा गृध्र भेटला ॥९५॥
ऐकता नामाची निजख्याती । उल्लास हनुमंताचे चित्ती ।
लंघावया अपापती । पुसे संपातीस नाममहिमा ॥९६॥
तू अंडज पक्षी पूर्ण । रामनामी नाही मरण ।
हे तुज कैसेनि गुह्य ज्ञान । मूळकथन मज सांगे ॥९७॥
श्रीरामभक्तांचे संगतीं । संपतीची गेली भ्रांती ।
पूर्वस्मरणाच्या अनुवर्ती । मारुतीप्रति सांगत ॥९८॥

संपाती हा जटायूचा बंधू, तारुण्यातील पराक्रम :

कश्यपाच्या निजकुळीं । अरुणवीर्याच्या समेळी ।
जटायु संपाती बंधु जावळी । आतुर्बळी जन्मलो ॥९९॥
दैत्य दानव मानव प्रौढीं । सहित देव तेहतीस कोडी ।
आमचे दृष्टीस घुंगरडी । बळाची गाढी अति मस्त ॥१००॥

आदित्यमनुधावतौ ज्वलंतं रश्मिमालिनम् ।
आवामाकाशमार्गेण जवेनोपगतौ भृशम् ॥१३॥
मध्यं प्राप्ते तु सूर्ये वै जटायुरवसीदति ॥१४॥

अंगी बळाची आंगवण । त्यावरी आले तरुणपण ।
पैज घालोनि दोघे जण । सूर्यचरणवंदनार्थ ॥१०१॥
पक्षबळाचेनि झडाडें । एक धावें एकापुढें ।
एक एकावरी चढे । सभानु पुढे लक्षोनि ॥१०२॥
वेगे येता सूर्यापासीं । तंव तो मध्यान्हासीं ।
जटायु जाला कासाविसी । रविकिरणेंसी पोळोनि ॥१०३॥
तो रिघाला मजतळीं । मी श्र्लाघलों तये वेळी ।
तंव पंखांची जाली होळी । गर्वमेळीं श्र्लाघ्यता ॥१०४॥
जटायूचे वांचले पंख । माझ्या पंखाची जाली राख ।
बाप गर्वाचें कौतुक । परम दुःख पावलों ॥१०५॥

संपातीचे पंख जळून त्याची असहायता :

माझ्या पंखाची होता होळी । थोर दिधली म्या आरोळि ।
अरुणें देखता तये वेळी । थोर कळवळी पुत्रस्नेहें ॥१०६॥
सूर्याप्रति सांगे अरुण । माझे पुत्र दोघे जण ।
स्वामीचें वंदूं येता चरण । पक्षदहण केले तेजे ॥१०७॥

अरूणास सूर्याचे वरदान :

भूतळीं जन करिती नमन । ते मी देखेन स्वये सुभान ।
मज दाविता अंगवण । गर्वे दहन दोही पक्षां ॥१०८॥
माझे तेजाचे निजदीप्तीं । गर्वीं तितुके भस्म होती ।
अरुणा तुझी हे संतती । म्हणोनि संपाती वांचला ॥१०९॥
अरुणा तुझे राखावया मन । पुत्ररक्षार्थ देतों वरदान ।
ते तू ऐक सावधान । पुत्रसंतान उद्धारा ॥११०॥
तू तंव माजा निजसारथी । मज तुज नित्य एक गती ।
तुझी उद्धरावया संतती । शुद्ध वरदोक्ती अवधारी ॥१११॥
श्रीरामभक्तांचे संगीतीं । ऐकता रामनामवचनोक्ती ।
निरभिभानें पक्षप्राप्ती । स्वये संपाती पावेल ॥११२॥
होता रामनामश्रवण । उभयपक्षीं निरभिमान ।
पक्ष पावोनि पूर्ण । अगम्य गमन करील ॥११३॥
निरभिमान पक्षप्राप्ती । आगमनिगम्यगती ।
येथे पावेल संपाती । सुखानुभूति श्रीरामे ॥११४॥
रामनामे दुःख निवृत्ती । रामनामे सुखसंपत्ती ।
रामनामे अगम्यगती । जाण निश्चिती सारथिया ॥११५॥
जेथे श्रीरामआगमन । जटायु पावेल जनस्थान ।
करिता सीतासंरक्षण । रामे उद्धरण जटायू ॥११६॥
दशरथकौसल्येच्या कुशीं । श्रीराम अवतरेल सूर्यवंशी ।
यालागी मैत्री दशरथासीं । करि विश्वासी जटायु ॥११७॥
जनस्थानामाझारी । जटायु गेला पक्षेंकरी ।
दक्षिणसमुद्राचे तीरीं । मी विंध्यांद्रि तेथे पडलो ॥११८॥
दग्धपक्ष देहव्यथा । काय खावें हे नित्य चिंता ।
राम नाठवेचि सर्वथा । वरदवार्ता विसरलो ॥११९॥
नेणे मी जटायु गेला केउता । तोही नेणे माझी वार्ता ।
जटायु धन्य तुम्ही बोलता । आजि म्या आता आयकिले ॥१२०॥

संपातीने विचारल्यावरुन हनुमंत जटायूचा वृत्तांत सांगतात :

कृपा करावी हनुमंता । म्हणोनि चरणी ठेविला माथा ।
जटायूची समूळ कथा । मज तत्वता सांगावी ॥२१॥
ऐकोनि जटायूचे नाम । संपातीसी आले प्रेम ।
धन्य धन्य जटायूचा धर्म । तेणे श्रीराम सेविला ॥१२२॥
मी करंटा पक्षहीन । राम नाठवे पापी पूर्ण ।
धन्य धन्य वानरांचे दर्शन । श्रीरामश्रवण मज जाले ॥१२३॥
श्रीरामाची कवण स्थिती । जटायूची कवण गती ।
तुम्ही अवघे प्राणत्यागार्थी । येथे का आलेती ते सांगा ॥१२४॥

नामधेयमिदं भ्रातुः श्रीरामोऽपि मया श्रुतः ।
तत्त्वमिच्छाम्यहं श्रोतुं विनाशं बांधवस्य च ॥१५॥

सात शतां वर्षांपाठीं । तुम्हा वानरांच्या वाक्पुटी ।
ऐकिली जटायूची गोष्टी । ज्याची चिंता वाहता चित्ती ॥१२५॥
जटायु पडला कवणे स्थितीं । जटायूची कवण गती ।
ऐसी चिंता वाहता चित्ती । शुद्धि निश्चिती आज जाली ॥१२६॥
रावणे करिता सीताहरण । जटायुरावणांसी रण ।
कैसेनि जटायु पावला मरण । श्रीरामे उद्धरण कैसे केले ॥२७॥
जटायूसी बळ संपूर्ण । मारू न शके त्यासी रावण ।
कैसेनि जटायु पावला मरण । समूळ कथन मज सांगता स्वानंदे ॥१२९॥
दाशरथि श्रीरघुनंदन । पितृवाक्यें वनाभिगमन ।
सीता समवेत लक्ष्मण । आला ठाकून जनस्थाना ॥१३०॥
जाली जटायूसी भेटी । स्वामिसेवकां पडिली मिठी ।
आश्रम केला गंगातटीं । पंचवटीं अति रम्य ॥१३१॥
रामाश्रमीं अहोरात्र । जटायु जाला घरतीकार ।
जानकी जननी अति सुंदर । अष्टौप्रहर संरक्षी ॥१३२॥
जटायु गेला वनभ्रमणा । मृगें छळिले रामलक्ष्मणां ।
भिक्षामिषें पै रावण । सीताहरण तेणे केले ॥१३३॥

ददर्श सीतां वैदेही ह्रियमाणां विहायसा ।
रावणं विरथं कृत्वा मोचयित्वा च जानकीम् ॥१६॥
छलेन युद्धधर्मेण रावणेन हतो रणे ॥१७॥

सीता आक्रंदतां जाण । जटायु आला पै धांवोन ।
रावणेंसी केले रण । अति निर्वाण ते ऐका ॥१३४॥
भंगिले चाप छेदिले शर । मारिले पिशाचवदन खर ।
झडपा हाणोनि रहंवर । अति सत्वर भंगिला ॥१३५॥
शिरींचा पाडोनिया मुकुट । दहाही झांबाडिले कंठ ।
रावणा भुलवोनि वाट । प्राणसंकट मांडिलें ॥१३६॥
नखक्षती वाहे रुधिर । वीस भुजा केल्या चूर ।
सोडवोनि सीता सुंदर । दशशिर गांजिला ॥१३७॥
जटायु पुरे पुरे रण । माझा निघों पाहे प्राण ।
रावण दांती धरोनि तृण । जीवदान मागतसे ॥१३८॥
रावण स्वये आला शरण । जटायु त्याचा न घे प्राण ।
रक्षिला शरणागत म्हणोन । सीता घेऊन सोडिला ॥१३९॥
पक्षें गांजिलें निश्चिंतीं । धुळीं मिळाली यशःकीर्तिं ।
रावण परतला पुढतीं । छळणार्थीं पणयुद्धें ॥१४०॥
घालोनि श्रीरामाची आण । जटायूस मृत्यु पुसे रावण ।
वामचरणांगुंष्ठीं माझे मरण । सांगे आपण छळणोक्ती ॥१४१॥
ऐकता निजबंधूची ख्याती । उल्लास संपातीचे चित्ती ।
तंव तंव निजपक्ष वाढती । जेंवी वंसतीं वृक्षांगें ॥१४२॥
श्रीरामाची निर्वाण आण । जटायु मानोनि प्रमाण ।
उभयपक्षीं सांगे मरण । युद्धा रावण पेटला ॥१४३॥
जटायूने एकाएक । अंगुष्ठ छेदिला सनख ।
रावणे उपडिले दोनी पंख । पावला दुःख जटायु ॥१४४॥
पक्षोत्पाटीं यावे मरण । घ्यावया श्रीरामाचे दर्शन ।
करिता श्रीरामनामस्मरण । कंठी प्राण राखिला ॥१४५॥
श्रीराम कृपाळु पै पूर्ण । राखता जटायूचा प्राण ।
तेणे धरोनिया चरण । युक्तवचनीं विनविले ॥१४६॥
तुजपुढे त्यजितां प्राण । मी होईन ब्रह्म पूर्ण ।
पुढे वांचल्याला भाग्य कोण । ऐसे मरण मग कैंचें ॥१४७॥
ऐकता जटायूचे वचन । श्रीराम जाला सुप्रसन्न ।
देही विदेही ब्रह्मपूर्ण । जाला आपण जटायु ॥१४८॥
ऐशापरी श्रीरघुनाथें । उद्धरोनि जटायुतें ।
पुढे सीतेच्या शुद्धीतें । आले निश्चिते किष्किंधें ॥१४९॥
तेथे वधोनि वाळीसी । राज्य दिधले सुग्रीवासी ।
यौवराज्य अंगदासी । वाळिसुतासी दिधले ॥१५०॥
तो अंगद दक्षिणेप्रती । सवे देवोनि जुत्पती ।
रामे धाडिले सीताशुद्ध्यर्थी । यावे मासांती मर्यादा ॥१५१॥
दक्षिण शोधिता समस्त । सीताशुद्धि न लभे येथ ।
मर्यादा लोटली विवरांत । तेणे धाकत अवघेही ॥१५२॥
अवकळा करोनि थोर । सुग्रीव दंडील महाक्रूर ।
तेणे भये हे वानर । आले समग्र प्राणत्यागासी ॥१५३॥
शुद्धि न लभेचि सीता । काय सांगावे श्रीरघुनाथा ।
थोर बैसली लज्जा माथा । प्राणत्यागार्था येथे आलो ॥१५४॥
एकोनि हनुमंताचे वचन । संपाती घाली लोटांगण ।
तुम्ही त्यजूं नका प्राण । सीता सांगेन मी तुम्हा ॥१५५॥
तुम्ही श्रीरामसेवक । माझे भवपाशमोचक ।
मी तंव चरणरजरंक । शुद्धि निर्दोष अवधारा ॥१५६॥
शतयोजनें समुद्रपारीं । लंकागडदुर्गामाझारीं ।
अशोकवनाभीतरीं । सीता सुंदरी दिसताहे ॥१५७॥
रामनाम नित्य वाक्पुटी । रामस्मरणाच्या निजदृष्टी ।
पैला पाहे सीता गोरटी । मज निजदृष्टीं दिसताहे ॥१५८॥
मज जै पंख असते येथ । मर्दोनियां लंकानाथ ।
सीता आणितों मी त्वरित । श्रीरघुनाथ सुखार्थ ॥१५९॥
ऐसे बोलता वचन । संपातीसी निरभिमान ।
पक्ष निघाले संपूर्ण । वरदान सुर्याचें ॥१६०॥
स्वये देखता वानरगण । पक्ष निघाले निरभिमान ।
निरभिमानाचें निजचिन्ह । सावधान अवधारा ॥१६१॥
मर्दोनियां लंकापती । म्या आणावी सीता सती ।
जगी होईल अति ख्याती । हेही अहंकृती त्या नाही ॥१६२॥
सोडवोनि सती सीता । सुख द्यावे श्रीरघुनाथा ।
मी एक सेवक पढियंता । हेही अहंता त्या नाही ॥१६३॥
निरभिमानाची निजकळा । मीतूंपण न दिसे डोळा ।
श्रीराम मजहूनि वेगळा । कदाकाळ स्मरेना॥१६४॥
श्रीरामभक्तांचे संगतीं । संपातीसी येवढी प्राप्ती ।
ऐकता ती श्रीरामकीर्ती । निजविश्रांती पावला ॥१६५॥
निरभिमानचें गमन । लंघोनियां त्रिभुवन ।
भूगोल भेदोनिया जाण । जाला परिपूर्ण परब्रह्म ॥१६६॥
ऐकोनि श्रीरामाची कीर्ती । पशु पक्षी उद्धरती ।
वनाभिगमन श्रीरघुपती । त्रिजगती उद्धार ॥१६७॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामनामे ब्रह्म पूर्ण ।
कथा ऐकता रामायण । उद्धरण जड जीवां ॥१६८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
संपातिउद्धरणं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
॥ ओंव्या १६८ ॥ श्लोक १७ ॥ एवं १८५ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग