धरा सतराचा हो मेळा ।
134.
धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदे ॥1॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी ब्रह्मरुपीचा हुडा ।
संत ऐकताती कोडां । प्रेमबळा आनंदे ॥2॥
नामादामा दोनी काळू । नामा विठा दमामे पैलू ।
चौघी सुना चारी हेलू । कडकडा बोल उमटती ॥3॥
गोंदा म्हादा करणी करी । नादे दुमदुमली पंढरी ।
आऊबाई तुतारी । मंजुळस्वर उमटती ॥4॥
गौणाबाई नोबतपल्ला । नाद अंबरी कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटला ॥5॥
जनाबाई घडयाळ मोगरी । घटका भरता टोला मारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदे ॥6॥
