बीज जाळुनि केली लाही
3348.
बीज जाळुनि केली लाही । आम्हा जन्ममरण नाही ॥१॥
आकारासी कैचा ठाव । देह प्रत्यय झाला देव ॥धृपद॥
साकरेचा नोहे उस । आम्हा कैचा गर्भवास ॥२॥
तुका म्हणे अवघा जोग । सर्वा घटी पांडुरंग ॥३॥
अर्थ :
बी भाजले की त्याची लाही तयार होते आणि ती लाही जमिनीत पेरली असता उगवतच नाही त्याप्रमाणे आम्ही कर्मरुपी बी ज्ञानरुपी अग्नीमध्ये भाजून काढले आहे व त्या कारणामुळे आम्हाला जन्ममरणच नाही. जगातील कोणत्याही आकाराविषयी आमच्यामध्ये स्थानच राहिले नाही त्यामुळे आमचा देह म्हणजे प्रत्यक्ष देवच झाला आहे. साखरेचा परत ऊस तयार होतो का तर नाही त्याप्रमाणे आम्ही आमचे कर्मरुपी बीजच जाळून टाकले त्यामुळे आम्हाला गर्भवास तरी कसा होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, एक पाडूरंगच सर्वत्र व्यापलेला आहे असाच अनुभव आम्हाला येत आहे. (मंबाजी गोसव्याने मारले त्या समयीचे अभंग)
