वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

काय आम्ही भक्ती करणे

🙏 3. संत तुकाराम · ABH-079656 · अभंग क्र. ४०६५

4065.
काय आम्ही भक्ती करणे कैसी । काय एक वाहावे तुम्हासी ।
अवघा भरोनि उरलासी । वाणी खाणी रसी रूपगंधी ॥१॥
कसे करू इंद्रिया बंधन । पुण्यपापाचे खंडण ।
काय व्रत करू आचरण । काय तुजविण उरले ते ॥२॥
काय डोळे झाकुनिया पाहू । मंत्रजप काय ध्याऊ ।
कवणे ठायी धरूनि भाव । काय ते वाव तुजविण ॥३॥
काय हिंडो कवण दिशा । कवणे ठायी पाय ठेवू कैसा ।
काय तू नव्हेसि न कळे ऐसा । काय मी कैसा पाहो आता ॥४॥
तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ ।
धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । वाहु पुष्पाजुळ तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
हे देवा आम्ही तुमची भक्ती काय आणि कशी करावी, काय म्हणून आम्ही तुम्हासी वाहावे ? कारण तुम्ही सर्वत्र भरुन उरला आहात सर्वांच्या वाणीमध्ये, अनेक खाणीमध्ये, रसामध्ये, रुपामध्ये, गंधामध्ये तुम्हीच आहात. इंद्रियांना आम्ही बंधन कसे करावे पाप व पुण्याचे खंडन कसे करावे ? तुझ्यावाचून काय व कोणते व्रताचरण करु तुझ्यावाचून येथे काय उरले आहे ? डोळे झाकून काय पाहावे मंत्र जप करुन कशाचे ध्यान करावे ? देवा अरे तुझ्यावाचून कोणतीही जागा मोकळी नाही मग कोणत्या ठिकाणी मी माझा भक्तिभाव धरुन राहू ? मी कोणत्या दिशेला व कसा हिंडू तू तर सर्वत्र आहे मग मी कोणत्या ठिकाणी कसा पाय ठेवू ? हे देवा तू न कळण्यासारखा आहेस की काय मग मी तुला कशा प्रकाराने पाहावे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी भुजा तुझ्या नामाचीच अर्चन, मंत्र, माळ, धूप, दीप, नैवेदय, फळ, तांबुल, पुष्पाजुल आम्ही तुला वाहू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग