जे सुख संतसज्जनाचे प
1509.
जे सुख संतसज्जनाचे पायी । ते सुख नाही आणिके ठायी ॥१॥
तुकितां या सुखाचेनी तुके । पै वैकुंठ जाले फिके ॥२॥
पाहोंजातां लोकी तिही । ऐसे न देखे आणिके ठायी ॥३॥
नवल या सुखाची गोडी । हरिहर ब्रह्मा घालिती उडी ॥४॥
क्षीरसागर सांडोनी पाही । अंगें धांवे शेषशाई ॥५॥
एका जनार्दनी जाली भेटी । सुख संतोषा पडली मिठी ॥६॥
