भक्त पहावया तांतडी ।
1253.
भक्त पहावया तांतडी ।
नामचि ऐकोनि घाली उडी ।
निजदासाची सांकडी ।
न देखे नाईके सर्वथा ॥१॥
ऐसा भक्ता ऋणाईत ।
सर्वदा सेवेसी तिष्ठत ।
मागे पुढे सांभाळित ।
त्यांच्या प्रेमासी भुलला ॥२॥
गजेंद्रा संकटी सोडविले ।
इच्छित उपमन्या दीधले ।
धृवासी नेऊनिया स्थापिले
गगणी बैसविले अढळपदी ॥३॥
गणिका पक्षियाते वोभाता ।
घालूनि विमानी ते तत्वता ।
नेली वैकुंठासी त्वरिता ।
निज भुवनी सन्मानिली ॥४॥
तैसाचि पुंडलिकासाठी ।
उभाचि इटेच्या नेहटी ।
युगे गेली परि हा गोठी ।
न करीची कदाही वैकुंठीची ॥५॥
बळीचा झाला व्दारपाळ ।
यशोदे नंदाचा हा बाळ ।
कंसचाणूरादिका काळ ।
सारथी कृपाळ अर्जुनाचा ॥६॥
धर्मा घरी तरी हा मंत्री ।
विवेक युक्ती प्रमाण सूत्री ।
गुण लावण्याचा धात्री ।
विचार सांगे सवहिताचा ॥७॥
भीष्म द्रोणाचा हा प्राण ।
सांगती विदुराचा भगवान ।
दौपदी लज्जेचे निवारण ।
वस्त्रे अपार पुरविली ॥८॥
निळा म्हणे भक्तासाठी ।
नित्य करुणा वाहे पोटी ।
शंखचक्रादि आयुधे मुष्टी ।
भक्तारक्षण् करावया ॥९॥
