विठ्ठलनामी आळस न करी
784.
विठ्ठलनामी आळस न करी गव्हरा|वायांचि वेरझारा शिणतोसी|१॥
हरी उच्चारण करी हा विचार |नामचि साचार उद्धरण॥२॥
मी म्हणता अहंता वाढे हे सर्वथा|परी भजनापरता नाही मार्ग॥३॥
मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा|विठ्ठलनाम पाठा वोळगे जना|४|
सर्व हे लटिके मोहजाळ फिकें|नामेंविण एके नाही दुजें॥५॥
नामा म्हणे उपदेश भजे केशवास|वैकुंठनिवास वोळगे तुज॥६॥
