पाषाण परिस भूमि जांब
3144.
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥
सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥धृपद॥
ऐंशी सहस्र जया सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥
पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥
चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥४॥
तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगाते कवडी गेली नाही ॥५॥
अर्थ :
रावणाच्या लंकेमध्ये परीसाचे दगड होते जांबुनद नावाचा मौल्यवान रत्नाची भूमी होती आणि रावणाच्या वंशाचा संबंध ब्रम्हृदेवाच्या वंशाशी होता. संपूर्ण लंकापुरी सोन्याची होती लंकेला समुद्राचा वेढा होता तेथे कोणालाही प्रवेश करणे शक्य नव्हते अशा या लंकापुरीमध्ये बलाढय राक्षसांचा प्रचंड समुदाय होता. रावणाच्या ऐंशी हजार सुंदर राण्या होत्या त्यामध्ये मुख्य मंदोदरी होती. अहो रावणाच्या मुलांचा व नातवंडाचा लेखाजोखा करणे अशक्य होते परंतू त्यामध्ये मुख्य पुत्र जो रावणाचा होता त्याने इंद्राला देखील युध्दामध्ये पराजित केले त्यामुळे त्याचे नांव इंद्रजित ठेवण्यात आले. चार युगांची मिळून एक चौकडी अशा चौदा चौकडयांचे मिळून आयुष्याची गणना रावणाला होती. आणि त्याच्यामागे कुंभकर्णासारखे बलाढय बंधूवर्ग होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने देव बंदी केला अशा रावणाच्याबरोबर मेल्यानंतर एक कवडी देखील गेली नाही.
