साधन संपत्ती हेचि मा
1851.
साधन संपत्ती हेचि माझे धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळीच नीट सुखरूप ॥धृपद॥
वैष्णवाचा संग राम नाम गाणे । मंडित भूषणे अळंकार ॥२॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडीच चाली जावे पायी ॥३॥
मायबाप दोघे पाहातील वाट । ठेवूनिया कटी कर उभी ॥४॥
तुका म्हणे केव्हा देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥
अर्थ :
विठोबाचे चरण हीच आमची योगयोगादी आणि विवेकवैराग्यादी साधनसंपत्ती आहे ; व हेच आमचे धनही आहे. पंढरीची वाट म्हणजेच माझ्या माहेरची वाट आहे. ही वाट शांत, जवळची, सरळ आणि सुखाची आहे. वैष्णवांची संगती आणि त्यांच्या संगतीत ' राम ' नामांचे गीत गाणे हीच आमची भूषणे आणि अलंकार आहेत, आणि या अलंकार- भूषणांनी आम्ही सुशोभित झालो आहोत. ही भवनदी कधीच आड आली नाही ; किंबहुना ती नव्हतीच असे झाले आहे ; आणि कोरड्या पायाने चालत जावे, अशी स्थिती झाली आहे. माझे मायबाप श्रीरूक्मिणी-पांडुरंग, ही दोघे कटावर हात ठेऊन उभी असलेली माझी निरंतर वाट पाहात असतील. तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरीला जाऊन केव्हा श्रीपंढरीरायाचा कळस बघेन, असे मला झाले आहे ; आणि त्यामुळे आळस, निद्रा, भूक ही सारी पळाली आहेत.
