(बाळक्रीडा अभंग)
3905.
(बाळक्रीडा अभंग)
ब्रिदावळी ज्याचे रुळते चरणी । पाउले मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चाली । कुंकुमे शोभली होय रेखा ॥२॥
होउनि भ्रमर पाउलांचे सुख । घेती भक्त मुख लावूनिया ॥३॥
याचसाठी धरियेला अवतार । सुख दिले फार निजदासा ॥४॥
निज सुख तुका म्हणे भक्ता ठावे । तींहीच जाणावे भोगू त्यासि ॥५॥
अर्थ :
ज्याच्या चरणाच्या ठिकाणी पतित पावन, दिनानाथ, भक्त वत्सल, सदाशिव असे विविध प्रकारची ब्रिदे शोभून दिसत होती अशा देवाच्या पावलाने, श्रीकृष्णाच्या पावलाने पृथ्वी सुखावली होती. अशा त्या देवाच्या पृथ्वीवर चालण्याने त्याच्या कुंकूंमंडित चरणाची पावले पृथ्वीवर उमटत होती त्या योगाने पृथ्वी फार सुखावत होती. सर्व भक्तजण भ्रमर होऊन कृष्णाच्या पावलांचे सुख, त्यांचे मुख लावून घेत होते, चाखीत होते. त्याने त्याच्या निजदासांना फार सुख दिले व याचसाठी त्याने अवतार धारण केला होता. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे निजसुख कसे आहे हे केवळ देवाच्या निजदासांनाच माहित आहे त्याच्या भक्तांनाच माहित आहे आणि ते भोगावे कसे हे देखील त्याच्या भक्तांनाच माहित आहे.
