समर्थाचे सेवे कोठे न
2888.
समर्थाचे सेवे कोठे नाही घात । पाहो नये अंत पांडुरंगा ॥१॥
आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥धृपद॥
निढळ राखिले तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥
तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
अर्थ :
समर्थ व्यक्तीची जो सेवा करतो त्याचा कोठेही घात होत नाही त्यामुळे पाडूरंगा तुम्ही समर्थ आहात आणि मी तुमचा सेवक आहे त्यामुळे तुम्ही माझा अंत पाहू नका. समर्थ व्यक्तीने कसे वागावे कसे राहावे याविषयी धर्मनीती आहे त्या धर्मनीतीचा तुम्ही विचार करावा आणि विचार केल्यानंतर माझ्या अंत:करणामध्ये येऊन तुम्ही वास करावा. देवा तुम्ही जर मला असेच अभागी ठेवले तर माझ्या चित्ताला जन्ममरणाचे भय वाटेल व मला अनेक प्रकारचे सुखदु:खे प्राप्त होतील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला केवळ तुमच्या दर्शनाचीच एक आवड आहे तुम्ही मला दर्शन दया तरच जगाला तुमची किर्ती कळेल व तुम्ही सर्व समर्थ आहात असा निवाडा देखील होईल.
