दाता लक्षुमीचा पति ।
3105.
दाता लक्षुमीचा पति । माझे मागणे ते किती ॥१॥
जाणे तान्हेल्याची तहान । पीता गंगा नव्हे न्यून ॥धृ॥
कल्पतरु झाला देता । तेथे पोटाचा मागता ॥२॥
तुका म्हणे संता ध्याता । परब्रम्हची आले हाता ॥३॥
अर्थ :
दान देणारा दाता जर लक्ष्मीचा पती आहे तर मग माझे मागणे तरी त्याच्यापुढे कितीसे आहे ? एखादया तहानलेल्या व्यक्तीने जर गंगेतून पाणी घेऊन त्याची तहान भागवण्यासाठी ते पाणी प्याले तर गंगेतील पाणी कधीही कमी होणार नाही. एखादा व्यक्ती कल्पतरुच्या वृक्षाखाली बसला आणि त्याला कल्पतरु प्रसन्न झाला व काय मागायचे ते दान माग असे कल्पतरुने त्या व्यक्तीला म्हटले तर त्या व्यक्तीने मला खूप भूक लागली आहे मला पोट भरुन जेवण्यास अन्न दे असे म्हटले तर त्याचे दान त्या कल्पतरुपुढे किती छोटेसे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी त्याप्रमाणे मी त्या संताचे ध्यान केले त्यांची सेवा केली तर परब्रम्हच माझ्या हाताशी आले.
