आणूनि सुरभि करी अभिष
142.
आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण ॥१॥
सुरवरांची दाटी करिती नमस्कार । होतसे अपार पुष्पवृष्टी ॥२॥
वेदमंत्रघोष ऋषि करिताती । अप्सरा नाचती थैयथैया ॥३॥
नारद तुंबर गंधर्व गायन । वर्णिताती गुण कृष्णाजीचे ॥४॥
यथा-विधि इंद्र पूजी विश्वंभरा जोडोनिया करा उभा राहे ॥५॥
आज्ञा घेऊनिया जाय स्वस्थळासी । येती गोकुळासी सकळीक ॥६॥
चरित्र जो कोणी उच्चारील वाचे । जळती पापाचे पर्वत हे ॥७॥
नामा ह्मणे ऐसे सांगतसे शुक । सूत पुराणिक शौनकासी ॥८॥
