छेदियेला वृक्ष तुटले
176.
छेदियेला वृक्ष तुटले ते मूळ । प्रपंच समूळ उडोनि गेला ॥१॥
गेले ते सुमन गेला फुलहेतु । अखंडित रतु गोपाळी रया ॥२॥
सांडिला आकारु धरिला विकारु । सर्व हरिहरु एकरूपे ॥३॥
निवृत्ति निधान वोळले गयनी । अमृताची धणी आम्हा भक्ता ॥४॥
अर्थ:
ह्या अभंगात आलेले रुपक मागच्या अभंगतुन आले आहे. त्या संसार वृक्षाला मी तोडला व तो समुळ उखडला.त्यामुळे त्या प्रपंचाचा निरास झाला. त्या प्रपंच वृक्षाच्या संसार नावाच्या फुलातील विषय नावाचा भोग गेला तसेच हेत म्हणजे इच्छा ही राहिली नाही.त्यामुळे मी अखंडितपणे त्या गोपाळाबरोबर रत झालो. शिव व विष्णु हे एकरुप आहे हे जाणवल्यामुळे सर्व जगताच्या आकार व विकार ह्यांना मी सोडले. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी सांगितलेल्या नाम निधानामुळे भक्तांना नामामृताची प्राप्ती झाली.
