सोपान म्हणे देवोत्तम
1111.
सोपान म्हणे देवोत्तमा | पुर्वी येथे होता ब्रह्मा | आणि तुम्ही सर्वोत्तमा | कोणे स्थळी होता देवा ॥१॥
देव म्हणे कथा परिस | कोट्यानुकोटी युगांस |आम्ही होतो पंढरीस | अनंत कल्पे गेली ॥२॥
अनंत भक्तांचिया मेळी | अनंत वंष्णवे भूमंडळी |माजी गवसले सकळी | केली आगळी पुंडलिके ॥३॥
येणे प्रसन्न केले शंकरा | शंकरे मज दाखविले निर्धारा | आपण राहोनि पाठमोरा | विश्व तारिले कीतने ॥४॥
भक्ताचेनि आराधने | साधियेले बहुत पुण्ये |माझे जालेंसे येणे | एक कारण पुंडलिकाचे ॥५॥
पूर्वापार पंढरीसी | होती विष्णुमात ऐशी |निर्धार करोनि मानसी | अहर्निश अनुष्ठान ॥६॥
येथोनि पूर्वमाग पंढरी | पश्चिमभागी ब्रह्मा अवधारी | अवतार कऱ्हे पाठारी | महादेव शिखरी मानदेसी ॥७॥
तेहतीस कोटी देवस्थळी | पूर्व पश्चिम वैश्य मंडळी | उग्र तप साधिले चंद्रमौळी | या इंद्रनीळ पर्वेतावरी ॥८॥
द्रोणाचळ इंद्राचळ | हनुमंते आणिला विशाळ |त्याच्या शाखा अधोमूळ | तो हा इंद्रनीळ पर्वत ॥९॥
येथे वल्ली सुवर्णाकार | गुप्त असती त्या निर्धार |दिसे अस्तमानी अंधार | दीप आकार जगाप्रती ॥१०॥
येवोनिया दक्षिणद्वार | गोकर्ण महाबळेश्वर | पाताळद्वारी पूजा शंकर | बेलपत्र अद्यापि निघती ॥११॥
नामा म्हणे देवाधिदेव | सांगितला स्वानुभाव | अधिष्ठान गुढाव | सोपानदेव निवांत ॥१२॥
