रुक्मिणी स्वयंवर-प्र
10.
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा
श्रीगणेशाय नम: ॥ राय चलिले मुगुटांचे ॥ थोर बळ गवेषणाचे । सैन्य पातले मागधाचे । युद्ध त्याचे दारुण ॥१॥
वेगी धनुष्या वाहिला गुण । शिती लावूनिया बाण । शस्त्रे झळकती दारुण । रणकंदन करू आले ॥२॥
राजे चालिले प्रबळ । यादव उठवले सकळ । दुमदुमली दोन्ही दळे । एकमेळे मिसळले ॥३॥
गगन कोंदले तिही बाणी । तळी खिळिली धरणी । मागे पाय न ठेविती कोणी । वीर रणी खवळले ॥४॥
वीर वीराते हणित ॥ लोहधुळोरा उसळत । वरिया वाट न चले तेथे । वीर अद्भुत मातले ॥५॥
शस्त्रेंसहित तोडिती कर । मुगुऎंसहित पाडिती शिर । गजांसहित मारिती वीर । सपिच्छ शर भेदिले ॥६॥
चरण तोडिले गजंचे । रजे पाडिले ब्रीदांचे । खुर छेदिले अश्वाचे । आंख रथांचे भेदिले ॥७॥
राजे विनटले अनेक । यांवरी उठावला श्वफल्क । बाणी त्रासूनिया देख । एके एक खिळियेले ॥८॥
वीर भिडिन्नले पडिपाडे । यादवाचे बळ गाढे । गवेषण चालिला पुढे । गुणी कुर्हाडे लाविले ॥९॥
श्वफल्क विंधिला पांच बाणी । रथ छेदूनि पाडिला धरणी । कंक सात्यकी हे दोन्ही । विसा बाणी विंधिले ॥१०॥
बण अनिवार निर्व्यंग । भेदिले वीरांचे अष्टांग । गवेषण योद्धा चांग । न करी पांग दुजयाचा ॥११॥ ।
चक्रदेव चालिला रागे । एके बाणे विंधिला वेगे । रथासहित घातला मागे । रणभूमि सांडविली ॥१२॥
देखोनि चालिला अतिदंत । कोपे खवळला अद्भुत । दहा वीस पांच सात । बा सह्त वरुषला ॥१३॥
बाणी निवारिले बाण । हांसिन्नला गवेषण । येरु कोपला दारुण । आठ बाण सोडिले ॥१४॥
दारुण बाण आले आठ । अनिवार अति उद्भट । रथसारथी केला पीठ । शिरींचा मुगुट पाडिला ॥१५॥
एक खडतरला बाण । गगना गेला गवेषण । क्रमूनियं ग्रहगण । ध्रुवमंडळ उडविला ॥१६॥
घयासरसी आली भवंडी । पडत पडत आवरली मुरकुंडी । रणांगणी घातली उडी । मूर्च्छा गाढी सांवरिली ॥१७॥
गवेषण आणिके रथा । चढोनि पातला अवचिता । पाचारूनि अतिदंता । होय विंधिता सा बाणी ॥१८॥
बाण सुटले कडाडी । पडली डोळिया झांपडी । काढों विसरला वोढी । थोर हडबडी अतिदंता ॥१९॥
दोन भेदले भुंजावरी । एक उरी एक शिरी । दोनी रुतले दोही करी । धरणीवरी पाडिला ॥२०॥
घाये लोळविला महाबळी । अधोमुख महीतळी । झोटी सुटली मोकळी । भाते तळी रिचवले ॥२१॥
हाक देऊनि गवेषण । रणांगणी उभा आपण । त्यावरी चालिला सारण । बाण दारुण घेउनी ॥२२॥
बाण विंधित चपल । धनुष्य तोडिले तत्काळ । दुजे धनुष्य घे भूपाळ ॥ तेही सबळ तोडिले ॥२३॥
तिजे धनुष्य वाइला गुण । तेही तोडिले विंधोनी बाण । जे जे धनुष्य घे गवेषण । ते ते सारण तोडित ॥२४॥
सारणे थोर केली ख्याती । धनुष्य घेऊ नेदी हाती । देखोन कोपला भूपती । मेढा निगुती वाइला ॥२५॥
सारणे विंधिला सारथी । ध्वजस्तंभ पाडिला क्षिती । येरे विंधिला बाणे साती । दोही हाती खोचला ॥२६॥
सारण विकळ पाडिला रथी । वीर मूर्च्छित पाडिले क्षिती । गवेषणे लाविली ख्याती । भद्रजती खवळला ॥२७॥
मग मिसळला जळभारी । करीत असे महामारी । वीर खिळिले जिव्हारी । शरधारी वर्षत ॥२८॥
येरीकडे केशिक वीर । वर्षत बाणांचा महापूर । बाणी त्रासिला बळिभद्र । दळभार वेढिला ॥२९॥
खड्ग तोमर गदा परिघ । वीर हाणिताती सैघ । राम साधक अति सांग । घाय आंगा लागो नेदी ॥३०॥
हल भवंडी चहूकडे । वीर पाडिले दडदडां । नांगरे केला जी उवेढा । केशिक गाढा हाकिला ॥३१॥
बाणी विंधिला प्रबळे । तिखट सोडी शरजाळे । बाण तोडोनिया हळे । निजबळे लोटला ॥३२॥
नांगर उचलूनिया निवाडे । नेहटून पाय ठेविला पुढे । घायी चूर केली हाडे । अशुद्ध उडे आकाशी ॥३३॥
सैन्यावरी लोटला देख । ठायी पाडिले सेनानायक । धरिता न धरवेचि तबक । वीर अनेक मारिले ॥३४॥
रथ भूमीसी आफळी । गज शुंडादंडी पिळी । शिरे खेळती चेंडूफळी । रणखंदोळी मांडिली ॥३५॥
धाक घेतला झुंजारी । केशिकसैन्य पळे दूरी । बळीभद्र पेटला महामारी । युद्ध वीरी सांडिले ॥३६॥
जरासंध देखिला दूरी । राम चढे रथावरी । रथ पेलिला झडकरी । उपराउपरी मारिला ॥३७॥
वेगी धनुष्या चढविला गुण । रामे काढिला निर्वाणबाण । गदे घातली आपुली आण । रणविंदाण पाहे माझे ॥३८॥
धीर धरी अर्ध घडी । पाहे युद्धाची निरवडी । जरासंधा बाणी फोडी । गर्वझाडी करीन ॥३९॥
गदू निजगडा महावीर । योद्धा रणरंगचतुर । बळीभद्रासी केला स्थिर । रहंवर धावविला ॥४०॥
येरीकडे यादवभारा । गवेषण पेटला महामारा । बाणी खिळिले महावीरा मुख्य धुरा खोंचल्या ॥४१॥
विकळ देखोनि दळभार । मागधवीरी केला मार । आट भविन्नला थोर । हाहाकार ऊठिला ॥४२॥
निजसैन्यासी महामार । दुरोनि देखे बळीभद्र । कोपे खवळल दुर्धर । रहंवर पेलिला ॥४३॥
परसैन्य देखोनि दृष्टी । वेगे चालिला जगजेठी । धडधडिल्या चक्रवाटी । उठाउठी पातला ॥४४॥
देखोनि शत्रूचा खटाटोप । बळीभद्रासी न धरवे कोप । बाहुस्फुरणे आला कंप । वेगे साटोप ऊठिला ॥४५॥
रथाखाली घातली उडी । शेष दडपला फडेबुडी । वराहाची दाढ तडतडी । कूर्मे गाढी पाठि केली ॥४६॥
वीर खिळूनिया बाणी । गवेषण गर्जे रणी । आल बळिभद्र धावोनी । निर्वाणबाणी विंधिला ॥४७॥
बाण विंधिला सबळ । येरे परजिले मुसळ । साधक बळिभद्र प्रबळ । बाणजाळ तोडिले ॥४८॥
नांगर उचलूनिया बळे । न धरत पातला तये वेळे । रथ सांडिला तत्काळे । वेगे पळे गवेषण ॥४९॥
सवेचि परतावया पाहत ॥ पायी घातला नांगरदात । गवेषण पडिल तेथ । भूमी दात आदळले ॥५०॥
लाजा उठिला त्वरित । तव बळिभद्रे दिधली लाथ । येरु अशुद्धाते विमित । पडिआ मूर्च्छित अचेतन ॥५१॥
सांडूनिया धनुष्यबाण । सैनिक धाविन्नला आपण । रथी घालोनिया गवेषण । घेऊनि प्राण पळाला ॥५२॥
देखोनि बळिभद्राचे बळ । राजे चालिले प्रबळ । पुढे करूनिया गजदळ । एक वेळ लोटले ॥५३॥
आले देखोनि परदळ । करीत हरुपाचा गोंधळ । झेलित नांगर मुसळ । वेगे सबळ उठिला ॥५४॥
गज हाणीत मुसळे । विदारीत कुंभस्थळे । घायी किळकिळती एक वेळे । गजकलेवरे पाडिली ॥५५॥
नांगर घालूनि रथावरी । शतसहस्रांचूर करी । पळत गज पायी धरी । तेणे किरकिरी करिताती ॥५६॥
चपळ चौताळती घोडी । नांगर घालोनि त्याते वोढी । घाये मुसळाचेनि पाडी । वीरझोडी मांडिली ॥५७॥
वीर वरुषताती शस्त्रास्त्रा । जैसा मेरूसी पर्जन्यधारा । रणी चालता बळीभद्रा । वीर थरथरा कापती ॥५८॥
पायींचे रगडिले पायी । कारुप राजा पाडिला ठायी । रथ रथ मोडिला पाही । सन्मुख घायी कोण राहे ॥५९॥
पृथ्वी तेचि उखळ जाण । नांगरे वीर घाली वैरण । मुसळघाये करा चूर्ण । रणकंदन मांडिले ॥६०॥
सात्त्विका दंतवक्रा युद्ध । गदे गोंविला जरासंध । मोकळा पडला हलायुध । वर्हाडी सुबुद्ध कांडिले ॥६१॥
वीरी घेतला रणकावो । देखोनि धाविन्नला शाल्वो । मिळोनि वीराचा समुदावो । महाबाही पडखळिला ॥६२॥
धावता देखोनि शाल्व वीर । आडवा आला अक्रूर । राहे साहे म्हणे स्थिर । धरी धीर संग्रामी ॥६३॥
तव बळिभद्र पावला रागे । अक्रूराते म्हणे उगे । मज पाचारिता अंगे । तू का वेगे आलसी ॥६४॥
रणी झुंजार विकळ जाय । तरी दुजयाने व्हावे साह्य । शाल्व बापुडे ते काय । कौतुक पाहे पै माझे ॥६५॥
मग चालिला शाल्वावरी । बळीभद्र वेढिला वीरी । बहुत उठिले महामारी । शरधरी वर्षती ॥६६॥
बाप बळीराम जगजेठी । नांगरे बाण तरी पिटी । अंग लागो नेदी चिरटी । शाल्व दृष्टी सूदला ॥६७॥
बाणी विंधिला अमित । राम बाणांते न गणित । वेगे उसळला अद्भूत । आला न धरत आंगेंसी ॥६८॥
रथ धरिला मकरतोंडी । शाल्वे वेगी घातली उडी । सापडला तो रथाबुडी । वोढाकाढी निष्टला ॥६९॥
रथ आपटिला भूमंडळी । वीर सापडले तयातळी । घाये केली रांगोळी । निधा पाताळी ऊठिला ॥७०॥
ते वेळी शाल्वे चुकविले आंग । घायासरिसा उडाला सवेग । मागुता आवेश धरुनिया चांग । रणी अव्यंग उभा असे ॥७१॥
शाल्व घेऊनिया गदा । ह्रदयी हाणता हलायुधा । गगना उसळला तो योद्धा । धावो नुसधा तळी गेला ॥७२॥
शाल्व रथी जव चढे । तव मुसळ वोपिले रोकडे । करीत अशुद्धाचे सडे । मूर्च्छित पडे अवनीये ॥७३॥
मग मिसळला मागधांत । घाये शतसहस्र मारीत । अशुद्ध भडभडा वाहात । नांगरे अंत पुरविला ॥७४॥
बळीबद्रे केली महामारी । वीर झोडिले नंगरी । तेथं वीर वीरंते परस्परी । एशियापरी वोलती ॥७५॥
हाती येरा दुकळ पडला । मग यासी नांगर साम्पडला । सैन्य नांगरावया आला । वीरकाशिया काढित ॥७६॥
नांगर घालूनिया बुडी । थोर उपडिलिया पेडी । रथगजकाटिया मोडी । पालव्या तोडी वीरांच्या ॥७७॥
अतिरथी जे उद्भट । समूळ फोडियेले खुंट । बळीभद्र हा कुणबट । केली चोखट रणभूनि ॥७८॥
महावीरा घालिता घावो । अशुद्धे डवरिला बलदेवो । तेणे शोभत महाबाहो । रणभैरवो डुल्लत ॥७९॥
रणमदे जाला मस्त । नांगर घेउनि नाचत । वीर देखोनि धावत । पुरला अंत सैन्याचा ॥८०॥
घाये मारीत महावीर । भडभडा वाहे रुधिर । लोटला अशुद्धाचा पूर । नदी दुस्तर उलथली ॥८१॥
नदी वाहता दुथडी । झाल्या प्रेतांच्या दरडी । वोडणे कमठें पुष्टी गाढी । गज करवडी महाग्राह ॥८२॥
बाबरझोटिया केशजाळ । तेचि नदीमाजी शेवाळ । मगर सुसरी महाविशाळ । शिरे विक्राळ वीरांची ॥८३॥
बाण तरती सपिच्छेंसी । तेचि मस्त्य रणनदीसी । धनुष्ये वाहती शितेंसी । वक्रगतीसी तेचि सर्प ॥८४॥
पडिले गजांचे अलंकार । घंटा घागरिया नूपुर । तेचि नदीमाजी दर्दुर । लहान थोर किरकिरती ॥८५॥
रथ ध्वजेंसी वाहात । तेचि तारुं शिडेंसहित । वीरा मोक्ष भरिले भरित । तारू तेथ श्रीकृष्ण ॥८६॥
एकेचि घाये शिर पडे । स्वर्गपर्यंत ते उडे । स्वर्गभोग त्या नावडे । कृष्णाकडे ते परतले ॥८७॥
कृष्णदृष्टी देहत्याग । तुच्छ करूनि सांडिती स्वर्ग । जिंतिला जन्ममरणाचा पांग । सुख अव्यंग पावले ॥८८॥
घाये उडाले शिरकमळ । टाकूनि गेले ध्रुवमंडळ । पदनमनेंचि अढळ । उतावेळ परतले ॥८९॥
देह अर्पिता श्रीकृष्णासी । चारी मुक्ती होती दासी । म्हणोनि आले कृष्णचरणासी । निजसुखासी पावले ॥९०॥
घायी उडाले शिर एक । टाकून गेले सत्यलोक । ब्रह्मसदन नावडे देख । कृष्णासन्मुख परतले ॥९१॥
देखोनि कृष्णाचे श्रीमुख । धिक्कारिला सत्यलोक । ब्रह्मसदन वांच्छिती मूर्ख । परमसुख हरिचरणी ॥९२॥
घायासरिसे शिर उडे । वैकुंठपर्यंत ते चढे । एकदेशी गति नावडे । हरीकडे मुरडले ॥९३॥
सांडूनिया कृष्णनाथा । आम्ही नेघो सलोकता । हरिचरणी ठेविला माथा । नेघो सर्वथा वैकुंठ ॥९४॥
शिर उडाले अंतराळी । अहंकारमुगुट पडला तळी । शिर न उतरेचि भूतळी । हरीजवळी पावले ॥९५॥
जेथे अभिमान तुटला । तेथेचि त्यास हरि भेटला । युद्धमिसे लाभ झाला । वीरा फावळा निजमोक्ष ॥९६॥
अत्यंत प्रळयींचा चिद्घन । वर्षताहे संकर्षण । वीरांचा अभिमान मर्दून । लिंगदेह छेदिल ॥९७॥
अधिकारिया मोक्षभावो । द्यावयालागी कृष्णदेवो । मिष भीमकीचा विवाहो । रणनिर्वाहो मोक्षाचा ॥९८॥
निधड्या वीरा जाली मुक्ती । देह लोभिया कवण गती । रण सांडोनिया जे पळती । ते विन्मुख होती कृष्णासी ॥९९॥
अश्व गज जे रणा आले । तेही श्रीकृष्णे उद्धरिले । युद्ध सांडून जे पळाले । ते पावले अवगती ॥१००॥
यापरी तो बळिभद्र । कृपेने कोपला दुर्धर । ब्रह्मसायुज्येंकरून मार । वीरे वीर आटिले ॥१०१॥
एका जनार्दनी कौतुक । कथारहस्य सुखदायक । पुढील कथा अलोकिक । समाधिसुख संग्रामी ॥१०२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे चैद्यमागधपराजयो नाम दशम: प्रसंग: ॥१०॥
॥श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु॥
