वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 5. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ › 1. रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण प्रसंग › 9. प्रसंग नववा रणसंग्राम सुरू झाला

रुक्मिणी स्वयंवर-प्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088062 · अभंग क्र. ९

9.

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग नववा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग नववा
श्रीगणेशाय नम: ॥ येऊनि जरासंधाप्रती । वीर प्रतिज्ञा बोलती । धनुष्ये वाइली हाती । रणी ख्याती लावुनी ॥१॥
आमुच्या बाणांची प्रौढी । केवी साहतील बापुडी । नेणती युद्धाची परवडी । रणनिरवडी माराची ॥२॥
यादवाचे बळ ते किती । आम्हा सन्मुख केवी राहाती । नोवरी सांडूनिया पळती । महारथी लोटले ॥३॥
आचांगळी अधिक शब्द । ऎकून उठिला वीर गद । कोपे खवळाला हलायुध । रणमद चालिला ॥४॥
रागे पेटला प्रबळ । घेतले नंगर मुसळ । नेत्रींहूनी निघती ज्वाळ । परदळ खळबळले ॥५॥
सैन्य आटीत हलायुध । देखोनि चालिला जरासंध । त्यावरी उठावला वीर गद । द्वंद्वयुद्ध मांडिले ॥६॥
महावीर बळीभद्र । म्हणोनि चालिला दंतवक्र । त्यावरी उठावला सात्त्विक वीर । येर येरा पडखळले ॥७॥
दोघा झाली दृष्टादृष्टी । घडघडिल्या चक्रवाटी । वोढल्या धनुष्यांच्या मुष्टी । दोघे हठी महावीर ॥८॥
रागे पौंड्रके चालिल । त्यावरी कृतवर्मा लोटला । रथ रथेंसी झगटला । गुण सुटला धनुष्याचा ॥९॥
बाण ओढूनिया ओढी । कृतवर्मा सवेग सोडी । पौंड्रकाचा ध्वज तोडी । पताका पाडी महीतळी ॥१०॥
ध्वज तोडिला देखोनी । वेगे विंधिला सहा बाणी । हातीचे धनुष्य तोडूनी । पाडिला धरणी कृतवर्मा ॥११॥
कृतावर्मा वीर अंगे । रथावरी चढला वेगे । धनुष्य बाहूनिया रागे । बाण अनेगेम वर्षला ॥१२॥
पौंड्रक बाणांते तोडित । बाणामागे बाण सोडित । अलक्ष लक्षूनि भेदित । वीर विख्यात कृतवर्मा ॥१३॥
हाती घेऊन तीन बाण । धगधगित अतिदारुण । पौंड्रका तुझा घेईन प्राण । वेगी विंदान पाहे माझे ॥१४॥
पौंड्रक निवारण करी । परी ते अनिवार भारी । एक सारथियात मारी । दोन उरी आदळले ॥१५॥
बाण भेदिले सपिच्छेंसी । पौंड्रक पाडिला धरणीसी । मूर्च्छना दाटली त्या कैसी । देहभावासी विसरला ॥१६॥
पौंड्रक पडिला मूर्च्छित । तव धाविन्नला विदूरथ । त्याते अक्रूर त्वरित । पाचारीत रणभूमी ॥१७॥
अक्रूर वीर अति गाढा । रथ आडवा रथापुढा । घालोनि उठिला वेगाढा । बळे मेढा वोढिला ॥१८॥
तुझे नांव तव अक्रूर । दारुण योद्धा नव्हेसी क्रूर । तुज कोण गणील वीर । रणी धीर न धरवे ॥१९॥
जयासी नाही वीरवृत्ती । तयासी अक्रूर गा म्हणती । तुजसी युद्ध ते किती । बाण शिती लाविला ॥२०॥
तुझिये ह्रदयींची क्रूरता । समूळ बाणी मी छेदिता । पाहे माझी अक्रूरता । मदगर्विता झाडीन ॥२१॥
सुटले दोघांचेही बाण । अति झणत्कारे वाजती गुण । बाणी गगन झाले पूर्ण । सूर्यकिरण झांकुळले ॥२२॥
मेघामाजी विजु तळपती । तैशा भाली झळकताती । बाण बाणा आदळती । तिडक्या उठती अंतराळी ॥२३॥
षड्‌विकार साही बाण । अक्रूरावरी घाली दारुण । येरी निर्विकर लक्ष साधून । बाणी बाण निवारिले ॥२४॥
तिखट उर्मीचिया भाली । सवेचि विदूरथ घाली । घाये करीन अबोध भुली । गर्जून बोली विंधित ॥२५॥
काढिला निजबोधकुर्‍हाडा । गुणी लावूनि लोटिला पुढा । भालीसहित तोडिला मेढा । गाढा धनुर्वाडा अक्रूर ॥२६॥
घेऊनि क्रोधाचा भाला । रथावरून तो उडाला । निश्चळ निजशांती विंधिला । भाला तोडिला माझारी ॥२७॥
गुप्त होती वासनासुरी । हाणो धाविन्नला उरावरी । स्वानुभवाची भाली खरी । धीरे निर्धारी विंधिली ॥२८॥
भाळी आदळली सत्राणे । विदूरथ झणाणिला तेणे । सुरी उडविली कोणे माने । गेली गगना दिसेना ॥२९॥
बाण अव्यय काढिला । गुणी अवगुणाचे जोडिला । अक्रूरे कानाडी ओढिला । उडविला ही विदूरथ ॥३०॥
बाप अक्रूर वीरराणा । कोणे नेटे सोइले बाणा । रथासहित उडविला गगना । रणप्रदक्षिणा करविली ॥३१॥
बाण भेदिला जिव्हारी । विदूरथ पडिला धरणीवरी । डोळा लागली अर्धचंद्री । जेवी खेचरी योगिया ॥३२॥
श्वफल्क सात्यक चक्रदेव । कंकसारणादि यादव । यांवरी उठावले राजे सर्व । अंगवंगादि कलिंग ॥३३॥
बाण सणासणा सूटती । खड्‌गे खणखणा वाजती । रथ रथांसी आदळती । वीर गर्जत सिंहनादे ॥३४॥
रणी उठिला लोहधुळोरा । तेणे चालो न शकेवारा । रणमद चढलासे वीरा । येर येरा हाकिती ॥३५॥
बाण बाणांसी आदळती । घायी तिडकिया उठती । तेणे पिसारे पेट घेती । बाण जळती अंतराळी ॥३६॥
करूषे घेऊनि बाण नव । वेगी विंधिल चक्रदेव । बाणासरसी घेऊनि धाव । रथावरूनि आसुडिला ॥३७॥
चक्रदेवे लवडसवडी । कारूषावरी घातली उडी । येरू सापडला रथाबुडी । बुद्धि गाढी तेणे केली ॥३८॥
अंग चुकवूनि वेगेंसी । चक्रदेव धरिला केशी । थडक हाणोन उराशी । कारूषासी पाडिले ॥३९॥
गजारूढ पै विख्यात । अंगराये पेलिला हस्त । चक्रदेवाचा मोडिला रथ । वीरा खस्त करीतसे ॥४०॥
अंग योद्धा महाबळी । रथ रगडी गजातळी । यादवसेना मंडळी । रणरांगोळी करू आला ॥४१॥
यादवामाजी कंक बळी । रागे करीत उठिला होळी । अंगासी हाणोनि कपाळी । गजासहित मारिला ॥४२॥
कलिंगसैन्यावरी देख । रागे उठिला सात्यक । वीर मारिले अनेक । रणी सैनिक पाडिले ॥४३॥
कोप आला कलिंगासी । सात्यकी विंधिला बाणे विसी । एकचि बाणे तोडूनि त्यासी । कलिंगासी पाचारिले ॥४४॥
गुणी लावूनि कुर्‍हाडा । मुकुट पाडूनि तोडिला मेढा । धनुष्य घेऊनि उठिला वेगाढा । कलिंग गाढा कोपला ॥४५॥
रथ विंधिला मकरतोंडी । सवेचि दोन्ही चाके फोडी । पाडली सट्यकिची मुरकुंडी । बाणी वितंडी विंधिला ॥४६॥
सात्यकी वीर जगजेठी । पडत पडता सवेचि उठी । गदा घेऊनिया मुष्टी । कलिंग दृष्टी सूदला ॥४७॥
सव्य अपसव्य घोवंडी गदा । न धरत पातला तो योद्धा । कलिंगे तोडिली ते गदा । सात्यकी क्रोधा चढिन्नला ॥४८॥
घेऊनि रथाचा पै आंख । वेगे धाविन्नला सन्मुख । कोपे होणो आला सात्यक । येरे मस्तक चुकविला ॥४९॥
रथाखाली घातली उडी । आंग चुकविले रथाबुडी । कलिंगाचा रथ मोडी । चारी घोडी मारिली ॥५०॥
वंगराजा रणप्रवीण । कोपे चालिला घेऊनि बाण । त्यावरी उठावला सारण । युद्ध दारुण तेथे जाले ॥५१॥
भोवता बाणांचा वळसा । सैन्य पाडिले धारसा । बाण भेदिले सपिच्छा । वंग त्रासा पावला ॥५२॥
सारणे थोर केला मारु । सारथी जाणि मारिले वारु । बाणी भेदिले रहंवरु । आणि दळभारू झोडिला ॥५३॥
विरथ केला वंगराजा । सवेचि चढे पट्टगजा । धनुष्य वाहोनिया वोजा । बाण पैंजा घेतले ॥५४॥
शर सोडिले सारणावरी । सारण बाणांते निवारी । गजे रथ केला चुरी । दात उरी लाविले ॥५५॥
रथाखाली घातली उडी । गज धरिला शुंडादंडी । सारण सोंडते मुरडी । गजाबुडी रिघाला ॥५६॥
गज मारावया एकसरे । सारण गजातळी फिरे । वंग वर्षताहे शस्त्रे । सारणा बाहेर निघो नेदी ॥५७॥
सारण कोंडिला महावीर । यादवदळी हाहाकार । ऎकोनि पावला बळिभद्र । वृक्ष थोर उपडिला ॥५८॥
राहे साहे म्हणे वंगाते । तेणे विंधिला बाणे शते । मुसळ घेऊनि डावे हाते । त्या बाणाते निवारिले ॥५९॥
दक्षिणहाती होता वृक्ष । एकेचि घाये कपाळमोक्ष । गज निमाला नि:शेष । अधोमुख पडियेला ॥६०॥
आडवा धाविन्नला केशिक । राजा उठावला मुख्य । झाला बळिभद्र । सन्मुख । दोघे देख खवळले ॥६१॥
केशिकावरी हलायुध । मारा पेटला सुबुद्ध । येरिकडे राजे सन्नद्ध । यादवांवरी उठावले ॥६२॥
केशिक राजा अतुर्बळी । राम मारील निजहळी । गवेषण राजा रणकल्लोळी । घेईल समफळी यादवांसी ॥६३॥
तेव्हा राम माजवील रणनदी । तेथे चहू पुरुषार्था मोक्षसिद्धी । कृष्णदृष्टीचिया प्रबोधी । सायुज्यपदी निजयोद्धे ॥६४॥
श्रीकृष्णाचिया दृष्टींपुढे । रणा येता सायुज्या चढे । निधडिया वीरा भाग्य चोखडे । सायुज्य रोकडे साधिती ॥६५॥
तेथे द्वंद्वयुद्ध अतितुंबळ । रणी माजेल रणकल्लोळ । एका जनार्दनी रसाळ । कथा कलिमलनाशिनी ॥६६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे । दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे नवम: प्रसंग ॥९॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग