रहेमतपुरी सर्व जाउनी
11.
रहेमतपुरी सर्व जाउनी राहिलो ।
आवघीच लागलो भिक्षा करू ॥१॥
भ्रतार तो थोर स्नानसंध्या करी ।
देव तयावरी कृपावंत ॥२॥
तेथील उपाध्या ग्रामीचा ग्रामस्थ ।
जावया उदित वाराणसी ॥३॥
ग्रामीचा वेवहार चालावयालागी ।
भ्रतार विभागी गेला तेणे ॥४॥
आपण काशीस जाऊनी तुम्हासेसे ।
उपाध्या ज्योतिषी रत्नाकर ॥५॥
देखोनी नेटका शहाणा विद्यावंत ।
सर्वही गृहस्थ तया पुसे ॥६॥
तेही केले मान्य मग मग तेथे राहो ।
वरुषाचा निर्वाहो येथे जाला ॥७॥
त्यावरी तो जाण आलीया ग्रामासी ।
रक्षिले आम्हासी वर्ष येक ॥८॥
ऐसे वरुष अकरा जालीया मजलागी ।
वाटे संतसंगी असावेसे ॥९॥
कथा आइकावी पुराण-श्रवणी ।
ब्राह्मणपूजनी चित्त रिझे ॥१०॥
तेथुनी प्राक्तने वोढोनिया जाण ।
तेत स्थळ त्यागून चालियेलो ॥११॥
उदास आंतर नावडेचि काही ।
प्रक्तनासी नाही उपाय तो ॥१२॥
बहेणि म्हणे पुढे कोल्हापूर क्षेत्र ।
जे अति पवित्र तेथे गेलो ॥१३॥
