दृष्टिमाजी रुप लखलखी
564.
दृष्टिमाजी रुप लखलखीत देखले ।
अव्यक्त ओळखिले तेजाकार ॥१॥
सांवळे सुंदर रुप बिंदुले ।
मन हे मुराले तयामाजी ॥२॥
अणुरेणु ऐसे बोलती संतजन ।
ब्रह्मांड संपूर्ण तया पोटी ॥३॥
निवृत्तीची खूण ज्ञानदेव पावला ।
सोयरा लाधला निवृत्तिकृपे ॥४॥
अर्थ :
तेजोमय परमेश्वरांचे जे अव्यक्त रुप ते माझ्या डोळ्यांनी मला स्पष्ट दिसले. ते अल्प बिंदरुप सुंदर स्वरुप पाहुन माझे मन तद्रप झाले. या परमेश्वराला संत अणुरेणु इतका संकोचित समजतात. पण त्यात सर्व ब्रह्मांड सामावले आहे येवढा मोठाही समजतात. निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ही ज्ञानाची खूण कळली. व त्यामुळे पांडुरंगराया मला सोयरा लाभला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
