तिही शून्यावरती नांद
563.
तिही शून्यावरती नांदताहे देही ।
तोचि ब्रह्मांड गेही भरुनि ठेला ॥१॥
जयाचा तो भास बिंबाकार आहे ।
ते खूण लाहे गुरुपुत्रा ॥२॥
बिंबाचे ते अंग ब्रह्म ते निघोट ।
वस्तु ते अविट तेज:पुंज ॥३॥
चळेना ढळेना जैसे तैसे तेचि ।
उपमा आणिकाची केवी साहे ॥४॥
बहुजन्मा शेवटी फळ हे पुण्याचे ।
अभाग्याशी कैचे प्राप्त होय ॥५॥
अपार अधिष्ठानी सत्य ही अभंगी ।
जाणूनिया वेगी जीवी धरा ॥६॥
ज्ञानदेव म्हणे यापरता नाही ।
उपदेश काही बोलावया ॥७॥
अर्थ :
हे गुरुपुत्रा सत्त्व, रज, तम, या त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडचा परमात्मा देहामध्ये नांदत आहे. व तोच परमात्मा सर्व ब्रह्मांडांमध्ये ओतप्रोत भरला आहे. हे ब्रह्मांड म्हणजे त्याचा भास आहे, हे गुरुपुत्रा ही खूण तू जाणुन घे. बिंबरुप जे ब्रह्म, ते एकरस, अविट, तेजःपुंज असे आहे. ते व्यापक असल्यामुळे चळत नाही, व ढळत नाही. असे ते एकरुप आहे. त्याला कशाचीही उपमा नाही. त्याची प्राप्ती होणे. हे अनेक जन्माच्या पुण्याईचे फळ आहे. त्याची प्राप्ती दुर्देवी माणसाला होत नाही. अशा त-हेच्या अपार अधिष्ठानरुप परमात्मा जाणून त्याला चित्तामध्ये कायमचा धरुन ठेवा. याच्या पलीकडे तुम्हाला उपदेश करण्याचे काही शिल्लक राहिले नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
