कृपावंत कोप न धरावा
1876.
कृपावंत कोप न धरावा । चित्ती छळू विक्रोक्ति स्तुती करू ॥१॥
आम्ही तुझा पार काय जाणो देवा । नेणो कैसी सेवा करावी ते ॥धृपद॥
अनंत अरुपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सर्वोत्तमा ॥२॥
चांगली हि नामे घेतली ठेवुन । जालासी लहान भक्तीकाजा ॥३॥
तुका म्हणे तुझ्या पायावरी सदा । मस्तक गोविंदा असो माझे ॥४॥
अर्थ :
देवा, आम्ही एखादेवेळी चांगल्या शब्दाने तुमची स्तुती करू, काही वेळा वाकड्या शब्दाने तुम्हाला छळू ; काही प्रसंगी तुमचे वर्म उघड करून तुमची निंदाही करू, परंतु हे कृपावंता, आमच्या अपराधाबद्दल मनात राग मानू नका. देवा, आम्हा अज्ञानी जीवांना तुझा अंत काय कळणार आहे ; आणि तुझी भक्ती कशी करावी, हे तरी आम्हास काय कळते ? हे अनंता, अरूपा, अलक्ष्या, अच्युता, निर्गुणा, सच्चिदानंदा, सर्वोत्तमा. देवा, ही चांगली नावे भक्तांच्या उध्दारार्थ तू स्वतःला ठेवून घेतली आहेत, आणि भक्तांना भक्ती करता यावी, म्हणून व्यापकाचा लहान झाला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोविंदा, असा तुझा महिमा अगाध असल्यामुळे माझे मस्तक तुझ्या पायावर अखंड असो.
