उदासीना पावल्या वेगी
2253.
उदासीना पावल्या वेगी । अंगा अंगी जडलिया ॥१॥
वेटाळिला भोवता हरी । मयोरफेरी नाचती ॥धृपद॥
मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥२॥
तुका म्हणे नारायणी । निराजनी मीनलिया ॥३॥
अर्थ :
काही गवळणी संसाराविषयी उदासीन झाल्या आणि त्या कृष्णाकडे धावत जाऊन कृष्णाच्या अंगाला अंग देऊन त्याच्या स्वरूपात जोडून गेल्या. त्यांनी हरीच्या भोवती वेढा घातला आणि मयूरा प्रमाणे फेरी करून नाचू लागल्या. त्या गवळणी मनाला येईल तशा क्रीडा करू लागल्या त्या अनेक होत्या परंतू हरी हा एकटा होतातरी देखील हरीने अनेक रूप धारण करून सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या. तुकाराम महाराज म्हणतात या सर्व गवळणी नारायणाच्या स्वरूपामध्ये मिसळून गेल्या.
