बुडविली क्रिया बुडवि
1274.
बुडविली क्रिया बुडविले कर्म | बुडविला धर्म पाहा येणे ॥१॥
तुझिया नामाचे लागलेसे पिसे | असोनि न दिसे लोकाचारी ॥२॥
नेणो काय कळे तुवा वागविला | संबंध तुटला मज नाम्याचा ॥३॥
बुडविला आचार बुडविला विचार | बुडविला संसार कुळासहित ॥४॥
आपुले पारिखे सर्वथा सारिखे | नेणो कवणे सुखे वेडावला ॥५॥
बुडविला मोहो बुडविली ममता | बुडविली अहंता मीतूंपण ॥६॥
हा नेणे वेव्हार का इंद्रियांचे सुख | अखंड याचे लक्ष तुझे पायी ॥७॥
बुडविली कल्पना समूळी वासना | बुडविली सेवा त्रिविध कैसी ॥८॥
हासे नाचे प्रेमे फुंदतू डुल्लतु | अहर्निशी गातु नाम तुझे ॥९॥
असोनि नसता केला ये संसारी | म्या वाहिला उदरी तैसा नाही ॥१०॥
गोणाई म्हणे देवा त्वा केली निरास | चाळविले उदास बाळ माझे ॥११॥
