तू बळिया शिरोमणी । आ
4073.
तू बळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनी ।
रिघालो पाठी तुझी म्हणउनी । आता करीन मनी असेल ते ॥१॥
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ ।
संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजी स्थापिला ॥२॥
उपकर्म करावा बहुत । तरी तू जाणसी धर्मनीत ।
उचित काय ते अनुचित । राखे शरणागत आलो आता ॥३॥
तू देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा शुर ।
महावीरा वीर धनुर्धर । मी तो पामर काय तेथे ॥४॥
किती म्या काय विनवावे । शरण आलो जीवे भावे ।
तुकयाबंधु म्हणे करावे । क्षेम आघवे येणे काळे ॥५॥
अर्थ :
हे देवा या त्रिभुवनामध्ये सर्व बलवंतांचा तू शिरोमणी आहेस. असे म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे घुसलो आहोत. आता तुझ्या मनाला येईल तसे तू कर. देवा तू कृपासिंधू आहेस दीनवत्सल आहेस रावणाच्या बंदीशाळेतील देवांची तूच सुटका केली आहेस तू सर्व दैत्य कुळाचा, राक्षस दळाचा संहार केला आणि तुला शरण आलेल्या बिभीषणाला लंकेच्या राज्यावर तू बसविले. जरी आम्ही काही उपक्रम करण्याचा प्रयत्न केला तरी तू सर्व धर्मनीती जाणत आहेस. आता उचित काय व अनुचित काय हे तूच पाहा आणि मी तुला शरण आलो आहे व शरण आलेल्या भक्तांचे तू रक्षण कर. देवा तू प्रताप दीनकर आहेस सुर व असुरांमध्ये तू शूर आहेस. सर्व वीरांमध्ये तू महावीर धनुर्धर आहेस मग तेथे मी पामर काय आहे ? तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात, देवा मी तुला किती आणि काय विनवावे त्यामुळे आता काहीच न करता तुला जीवेभावे शरण आलो आहे. देवा यावेळेला माझे सर्व प्रकारे क्षेमरक्षण करावे.
