पंचभूतांचिये सापडलो
2463.
पंचभूतांचिये सापडलो संदी । घातलोंसे बंदी अहंकारे ॥१॥
आपल्या आपण बांधविला गळा । नेणे चि निराळा असता ही ॥धृपद॥
कासया हा सत्य लेखिला संसार । का हे केले चार माझे माझे ॥२॥
का नाही शरण गेलो नारायणा । का नाही वासना आवरीली ॥३॥
किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणे बहु नास केला पुढे ॥४॥
तुका म्हणे आता देह देऊ बळी । करुनि सांडू होळी संचिताची ॥५॥
अर्थ :
मी पंचभूताच्या अडचणीत सापडलो आहे आणि त्या विषयीच्या मिथ्या अहंकाराच्या बंदि मध्ये मी घातलो गेलो आहे. आपण देहाच्या स्वरूपामध्ये आपला गळा बांधून टाकतो आहे त्यामुळे आपण देहापेक्षा निराळे आहोत हेच समजत नाही. कशासाठी मी हा संसार सत्य मानला असेल आणि संसारातील सर्व काही माझे माझे असे मी का म्हणलो असेल. मी आज पर्यंत नारायणाला शरण का बरे नसेल गेलो का मी माझी वासना आज पर्यंत आवरली नाही? तुकाराम महाराज म्हणतात आता आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन देहाचा बळी देऊ आणि संचित कर्माची होळी करून टाकून देऊ.
