श्रीविठ्ठले आपुल्या
1375.
श्रीविठ्ठले आपुल्या मुखवचने | नामदेवासी करी अज्ञापन|होवोनि दीनाचे अति दीन | सद्गुरूसी शरण रिघावे ॥१॥
जोडल्या सद्गुरुकृपालेश | मग सर्वत्र माझाचि प्रकाश |तुज मज भेदाचा भास | तो निरसोन जाईल ॥२॥
नामा म्हणे तुजसी | पावावया सेविजे सद्गुरूसी |तो तू रोकडा जोडिलासी | आता सद्गुरूसी काय काम ॥३॥
फळ तरूवर शिखरी | म्हणोनि आरोहण कीजे त्यावरी |ते फळ अवचिता जोडिले करी | मग तयावरी कासया चढावे ॥४॥
मग श्रीहरी म्हणे अज्ञान | सांडून सेविजे गुरुचरण |तुझ्या प्रेमे माया सोंग धरून | लटिका तुजपाशी मी खेळे ॥५॥
जंव सद्गुरूचे नाही सेवन तंब मी जैसे स्वप्नीचे धन |माझे न तुटे भवबंधन | सद्गुरूआज्ञेवांचूनी ॥६॥
तेणे नामा सद्गदित जाला | विठोबाच्या चरणी लागला |कोण गुरु पाहिजे | केला ते सांगिजे स्वामिया ॥७॥
मग श्रीविठ्ठल म्हणे ऐक आता | सांगेन सद्गुरूची वार्ता |त्वा पाहोनि तत्त्वता | शरण तात्काळ रिघावे ॥८॥
भक्तीचे नेणे लक्षण | कृपामंद दयाहीन |इतरांचे अवगुण | अखंड मुखी जल्पती ॥९॥
मी एक जाणता सर्वांठायी | सर्व शिकविले म्यांचि पाही |ऐसे बोलती जनप्रवाही महंतीलागी ॥१०॥
देखिलिया सज्जन | त्यासी करी सन्मान |सभा देखोनिया छळण | करी करवी तयाचे ॥११॥
लांडे लटिके गद्य पद्य | पुसोनी होती श्लाघ्य |नेणे तरी हांसोनि निद्य बोलती ह्या गुरूसी ॥१२॥
तो जरी सांगे खरे | त्यासी बोलती बरे बरेंसभाजनांसी नेत्रद्वारे | अशुद्धता दाविती ॥१३॥
आपण न सांगती आपुले गुज | पुढल्यासी म्हणती नकळे तुज |ऐसे संदेह करणीचे मोज | वाटे तथा ॥ १४ |शिष्य करिता उल्हासती | शिष्य होई म्हणोनि उपदेशिती |नानापरी बोधिती | सेवेलागी ॥१५॥
शिष्य करिती बहुवस | त्यांच्या सेवेची करिती आस |जो न भजे त्यास | शिव्याशाप देताती ॥१६॥
तंत्र मंत्र उपदेशिती ध्यान आसनी गोविती |देवा ब्राह्मणा न भजती | आचार भ्रष्ट जे ॥१७॥
धातु विद्येची धरिती गोडी | जारणमारणाची अति आवडी |विषयवासनेची हुंडी | अखंड जीवी ॥१८॥
ज्ञान गर्वाचा महिमा बरवा| श्रीगुरु ऐशा अखंड भावा |शिष्य समुदाय देखोनि गर्दा | थोरीवेचा मानिती ॥१९॥
असो बहु ऐसे कथन | परी सद्गुरु कृपाधन |त्याचे ऐक महिमान | सावध चित्त ॥२०॥
ज्यासी गुरूत्वाचे नाही काज | शिष्य भजता वाटे लाज |उदास वृत्ति सहज | निर्मळ भोळा ॥२१॥
निंदा स्तुति समान | बोलती भेदिती कठिण वचन |कधी न होती क्रोधायमान | कवणाहीवरी ॥२२॥
जे नेणती खरे खोटे | समान वाटे सान मोठे |सुखदुःखाचे चपेटे | न शिवती कदाकाळी ॥२३॥
शिष्य करिता आळस चित्ती | केलिया सर्वस्व निरोपिती |काही थोरीव नाहींच चित्ती | महत्वाची ॥२४॥
सज्जन देखोनी आनंदती | त्याचे गुणागुण न विचारिती |जीवे भावे इच्छिती | साधुसंग ॥२५॥
आपुला कष्टथुनी देहो | ज्ञान तर्काचा कलहोसाधुसेवेचा मनी लाहो | करी सदा ॥२६॥
जे आंत बाहेरी भरोनी उरले | अंतरी निवोन विराले |परब्रह्म सहजाविले | नेणो काय ॥२७॥
ऐसे साधुचे महिमान | साधता कैचे उरेल मन |कल्पा अवधी करिता कथन | नव्हे पूर्ण पूर्णता ॥२८॥
ऐसा साधु भेटेल तुज | तरी मीच होवोनि पावसी मज |जाईल सर्व संदेह आज | आपेसाप नाम्या ॥२९॥
मग नामदेव म्हणे देवा | ऐसा साधु भेटेल जेव्हा |तरी कैशापरी सेवावा | कृपानिधी तो ॥३०॥
मग बोलिले श्रीरंग | दैवत बुद्धीचा होईल त्याग |तन मन अपन चांग | शुद्ध सेवा करावी ॥३१॥
तर्क वितर्क बाह्यमुद्रा | तेथे न चलेगा भक्तनरेंद्रा |तारी तारी या भवसमुद्रा | म्हणोनि धरण रिघावे ॥३२॥
ते अंतर्बाह्य व्यापक | जाणता सर्व लीला कवतुक |जैसे त्यासी देखती देख तैसे तयासी आज्ञापिती ॥३३॥
भाग्ये जरी जोडती त्याचे चरण | तरी वर्तणूक आहे कठीण |ते तुज सांगतो गुप्त खूण | सावधान ऐक पा ॥३४॥
शरीर वेंचिले तरी वेंचिजे | परी सद्गुरुवचन नुल्लंघिजे |रात्रंदिवस राहिजे | आज्ञा संकेती ॥३५॥
ज्यावरी गुरुची प्रीति | त्याची अनन्य भावे कीजे भक्ती |आज्ञेवांचोनि कल्पांती | विरोध कोणासी न करावा ॥३६॥
का जरी तो सर्वातिरी आहे | विरोध कोणाचा न साहे |विशेष सद्गुरु जरी होये | तरी खेद न कीजे ॥३७॥
अरे विरोधभाव असता | ते चढे सद्गुरूच्या माथा |जैसा घटभंग होता | अमृत सांडे ॥३८॥
ज्याशी सद्गुरूची कृपा असे | त्यासि मानावे आम्ही ऐसे |सर्वस्व जाता मानसे | न करिजे अंतर ॥३९॥
देखे त्याचे हृदयांतरी | सद्गुरु बसे निरंतरी |त्यासि खेद होता भारी | अंतरे सद्गुरु ॥४०॥
क्रोध हृदयी भरला | तो आत्मस्थितीसी अंतरला |तोच गुरूचा घात केला | शिष्याहाती ॥४१॥
गुरुशिष्य तोचि निजबंधु | त्यासि स्वप्नी न कीजे विरोधु |करिता घडे गुरुवधु | शास्त्रवाक्य ॥४२॥
तरी गा कार्याकारणे बोलिजे तेंची घडावे वर्तणे |एक होता कोपायमानें| एक समाधान त्यास द्यावे ॥ | ४३ ॥
जो आपुल्या गुरूची स्तुती करी | त्याचे चरण वंदावे शिरी |निंदा बोलतीये अवसरी | निषिजे तेथोनी ॥४४॥
गुरूसमीप न बैसिजे | गुरूसी वचन न बोलिजे |आज्ञा मागोनी बंदिजे | कार्याकारणे ॥ | ४५ ॥
देशी आहे सद्गुरु | तिकडे कीजे नमस्कारू |चंद्रकारणे चकोरू | तैसा भेटी इच्छिजे ॥४६॥
गुरूसी अपजे तन मन | गुरूसी अर्पिजे वित्त धन |गुरूसी अपजे चैतन्य | आनंदरूप ॥४७॥
गुरूचे दोष गुण | मने न कीजे उच्चारण |जे जे गुरूचे आज्ञापन | मेरू ऐसे मानिजे ॥४८॥
सज्जनाची संगती भरिने | गुरूरूप विश्व मानिजे |चित्तानुसार अर्पिजे | साधुजनांसी ॥४९॥
ज्यासि सद्गुरु कोपला | तो साधु असता खर वागला |ईश्वर जरी साह्य जाला | तरी काढो न शके ॥५०॥
सद्गुरु आधीन सकळ देव | गुरु आधीन पितर मानव |सद्गुरु पूजिता सर्व आनंदाते पावती ॥५१॥
ऐसे सद्गुरूचे महिमान | म्हणोनि ब्रह्म त्या आधीन |तो जरी पतितासी देईल मान | तरी ब्रह्मपूर्ण तो होय ॥५२॥
ऐसे जेणे आचरावे | तरी सद्गुरूसी शरण जावे |नाही तरी करावे | नामस्मरण माझे पै ॥५३॥
तेणेंकरून कांही एक | निवारू शकेल जन्मदुःख |कोणे एक जन्मी सद्गुरु देख | भक्ति करोनि पाविजे ॥५४॥
चढाओढी गुरु करिती | मग सुबुद्धिहि टाकिती |त्यासी यमाघरी प्राप्ति | खरत्वाची ॥५५॥
सद्गुरुसेवा ते मोक्षपद | सद्गुरुसेवा ते आनंदपद| सद्गुरुसेवा तो ब्रह्मावबोध | कंवल्यप्राप्ती ॥५६॥
असो ऐसिया परी | जो सद्गुरु वाक्य वाहे शिरी |तोचि ब्रह्मविद्येचा अधिकारी | हरिहरा वंद्य तो ॥५७॥
ऐसे नामदेवाप्रति श्रीहरी | स्नेह साक्षेपे निरूपण करी |ऐकोनिया चरणावरी | सद्गदित होउनि लोटला ॥५८॥
देवा तू होवोनि माझी दिवटी | गुरुनिधान दाखवी दृष्टी |जेणे करूनी भवबंध गांठी | सुटेल सर्वथा ॥५९॥
मग कळवळोनी श्रीहरी | नामदेवाते पोटासी धरी |जाय पावशील झडकरी | हस्त विसा खेचराचा ॥६०॥
तेणे नाम्यासी समाधान | देवही जाला सुखसंपन्न |नामा पावोनी ब्रह्मज्ञान | मिळशील माझ्या स्वरूप ॥६१॥
ऐसे है देवभक्त निरूपण | प्रथम शिष्यासी करवी श्रवण |मग दीजे पूर्णपण | म्हणे नामा ॥६२॥
