कासयाची चाड मज नाही
911.
कासयाची चाड मज नाही वो साजणी ।
एकल्या निर्गुणी वेधियेले वो माये ॥१॥
पवन वेगाचेनि अंतरले तुम्हासी ।
आता मागुती वो कैसी परतेन वो माये ॥२॥
ध्यान धारणा तनु मनु करणे ।
ठेवियेले ठेवणे गोपाळचरणी वो माये ॥३॥
ऐसे भुलवणी भुलविले नयनी ।
रखुमादेविवर चिंतनी वो माये ॥४॥
अर्थ :
एका निर्गुण परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मनास वेध लागला म्हणजे मग प्रपंचातील कोणत्याही पदार्थाचे कौतुक उरत नाही. त्याचे वेधा ने मी कसे तात्काळ सोडून दिले म्हणशील तर सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे कोणतेही स्थान लवकर त्याग करतो. त्याप्रमाणे मी तुमचा सर्वांचा त्याग केला (वास्तविक प्रपंचाचा त्याग करावा लागतो असे नाही. कारण परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर उत्तर क्षणीच संसाराचा आपोआपच त्याग होत असतो) अशा रितीने ज्याच्या संसाराचा त्याग सहज झाला आहे. तो पुन्हा संसाराकडे कशाला पाहील. त्या परमात्म ज्ञानाकरिता पूर्वी केलेले ध्यान धारणादि उपाय ज्या श्रीगोपालकृष्णाच्या चरणी लागून गेले होते. ते त्याच्याच चरणी समर्पण केले. अशा प्रकारे त्या श्रीकृष्णाने आपल्या नजरेने मला भुलवून सोडले आहे. म्हणून रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याच्याच चिंतनात मी सतत राहात आहे. असे माऊली सांगतात.
