वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079602 · अभंग क्र. ३८३९

3839.
(बाळक्रीडा अभंग)
नाही त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतिया सवे येऊ नेदी हरी । तर्कवादी दुरी दुराविले ॥२॥
वादियांसि भेद निंदा अहंकार । देऊनिया दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबद्ध देवा । करिता या सवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥६॥
जीही हरीसंग केला संवसारी । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥

अर्थ :
गोपाळ आपल्या वाचून दुसरे काहीही जाणत नाही याविषयी वैकुंठनायकाला कोणतीच शंका नव्हती. ज्ञानीपणाचा अभिमान असणा-या लोकांना हरीने आपल्या जवळ कधीही येऊ दिले नाही. तर्कवादी लोकांना तर हरीने केव्हाच दूर केले होते. नेहमी मतमतांतरावरुन वाद करणा-या लोकांना भेद, अहंकार व निंदा हे आहेर देऊन त्यामध्येच गुंतवून देवाने त्यांना आपल्यापासून दूर ठेवले होते. अशाबद्ध्‍ असणा-या कुटूंबाची सेवा करणा-या लोकांना देवाने आपल्यापासून दूरच ठेवलेले आहे. ज्यांच्या चित्तामधे धन, दारा, पुत्र, संपत्ती आहे त्यांना तो पशूसमान समजतो. जे देवाला विसरुन गेले त्यांनी नरक प्राप्त करुन घेतला असून भवनादीमधेच ते बुडाले आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी संसारात राहून हरीची संगती केली त्यांनी मनुष्य जन्मात येऊन आपला जन्म सफल केला सार्थकी केला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग