स्वरूपी पाहता बिंबी
52.
स्वरूपी पाहता बिंबी बिंब उमटे ।
ते मेघःशाम दाटे बुंथी मनी ॥
चित्त वित्त हरि झाला वो साजणी ।
अवचिता अंगणी म्या देखीयेला ॥
सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडे ।
दिसे चहूंकडे एकतत्व ॥
ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसुनि पाही ।
एका रूपा सोयी बाही तरशील ॥
अर्थ :
त्या मेघशामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे. त्या सगुण रुपाला अंगणात मी अवचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो. त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यानी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले. त्या रुपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरुन जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
