का रे गमाविल्या गाई
3724.
का रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागे झाले काई । एका ते का नेणसी ॥१॥
केलासी फजित । मागे पुढे ही बहुत । लाज नाही नित्य । नित्य दंड पावता ॥धृपद॥
वोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तये काढी । धावेल कापडी । तुझी आधी वोढाळा ॥२॥
चाले चाल धावे । मी ही येतो तुजसवे । तुका म्हणे जव । तेथे नाही पावली ॥३॥
अर्थ :
अरे इंद्रिय रुपी गायी तु का चुकलेल्या आहेस आता तुझी ओळती आली आहे त्यामुळे तू लवकर जावे. मागे काय झाले आहे हे तुला माहित नाही काय? अरे मागे कित्येक लोकांची फजिती झाली आहे अशीच तुझी देखील मागेपुढे खूप फजिती झाली आहे होणार आहे. अरे काळ तुला नित्य दंड करीत आहे तरी देखील तुला अजूनही लाज वाटत नाही. अरे जन्ममरण रुपी ओला खोडा व त्यामध्ये अज्ञानाची खिळ ही गाढ रोवली गेली आहे आणि त्याला काढेन असा कोण आहे? तुझी कापडी गाय विषयांच्या पाठीमागे सैरावैरा धावत जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात चल लवकर धावत चल आणि सैराट इंद्रिय रुपी गाई ताब्यात घे आणि त्यांना परमार्थाकडे हरिभक्ती कडे लाव मी ही तुझ्या बरोबर येतो, जोपर्यंत तुझे श्रवण आणि रसना रुपी गाय विषयाच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत त्यांना तू ताब्यात घ्यावे.
