त्रैलोक्य पावन जनी ज
215.
त्रैलोक्य पावन जनी जनार्दन । त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥१॥
नाही आम्हा काळ नाही आम्हा वेळ । अखंड सोज्वळ हरि दिसे ॥२॥
ब्रह्म सनातन ब्रह्मीचे अंकुर । भक्तिपुरस्कार भूते रया ॥३॥
निवृत्ति म्हणे दीन दुबळ मी एक । मनोमय चोख आम्हा गोड ॥४॥
अर्थ:
स्वर्ग, मृत्यू व पाताळ ह्या तिन्ही लोकांत तो जनार्दन परिपूर्ण आत्मज्योत घेऊन त्रैलोकाला पावन करतो.आम्हाला काळ वेळेचे बंधन नाही अखंडपणे त्या सोज्वळ हरिचे सानिध्य असते. जे भक्त जीवदशेत त्याचा पुरस्कार करतात ते ब्रह्मदशेचे कोंब होतात.निवृत्तिनाथ म्हणतात मी एक दीन दुबळा आपले मनोगत सांगतो आहे. ते मनात घर करुन राहिलेले स्वरुप शाश्वत आहे व ते आम्हाला आवडते.
