नेत्र माझे रोडले आठव
1574.
नेत्र माझे रोडले आठवे माहेर | के भेटेन निरंतर बाईयांनो ॥१॥
चतुर्भुज विठ्ठल के देखेन डोळा | भक्तांचा जिव्हाळा जीव माझा ॥२॥
येणे शोके रे वाळलो शरीरीं| आठवतो हरि मी काय सांगू ॥३॥
चारी भुजा उचलोनि क्षेम देईल | के मज नेईल पंढरपुरा ॥४॥
काम चित्ती न लगे आता कांही मज | के भेटल राजा पंढरीचा ॥५॥
त्यासि आठविता हृदय वो फुटे | तो के मज भेटे बाप माझा ॥६॥
येणे देह न पवती मग काय येउनि करिती | सांगा काकुळती रखुमाईसी ॥७॥
वामांगी रुक्मिणी के देखेन दोन्ही नयनी | फेडीन पारणी डोळियांची ॥८॥
जंब जंव आठवती तंव तंव उभड येती | कोणी न सांगती विठ्ठलासी ॥९॥
ऐसे श्रवणीचे सुख कैचे नवो देखे | येथे येऊनि बहुतेके काय करिती ॥१०॥
गरुडटके अवधे आकाशी ओळले | येवोनि सांगितले विष्णुलोकी ॥११॥
मग जावोनिया तया ठाया पाहे पंढरिराया लागेन मी पाया तयाचिये ॥१२॥
याचि लागोनिया आलो लवडसवडी | सांडियेली थड मग रोखिलासी ॥१३॥
गरुडावरी आरूढ बाप माझा जाला | मज न्यावया आला बाईयांनो ॥१४॥
येणे हर्ष संतोष कोठेच न माये | भेटला विठ्ठल माय रुक्मिणीसहित ॥१५॥
नामा जातसे माहेरा एकला पंढरपुरा| हरी दातारा संसारा वेगळा करी ॥१६॥
