दिव्यरूप चक्षु कैशाप
379.
दिव्यरूप चक्षु कैशापरी झाला ।
ठसा हा उमटला कवण्यापरी ॥१॥
चहू देहांचा वर्ण अवर्ण देखिले ।
विश्व म्या पाहिले तयामध्ये ॥२॥
ज्ञानदेव म्हणे सर्वांचे जे मूळ ।
सत्रावी केवळ शुद्धरूप ॥३॥
अर्थ :
परमात्मतत्त्व प्रतितिला येण्याकरिता मला दिव्यदृष्टी कशी प्राप्त झाली त्या दृष्टीने माझ्या अंतःकरणावर स्वानुभवाचा ठसा कसा उमटला. तसेच त्या दिव्य दृष्टीने मला चारी देहापलीकडचे तत्त्व कसे दिसले व त्या तत्त्वांत मा विश्व कसे पाहिले. माऊली ज्ञानदेव या प्रश्नाचे उत्तर देतात की सर्व विश्वाभासाचे मूळ शुद्ध स्वरूपच आहे व तेच अधिष्ठान आहे.
