एकांतीचे गुज पुसो गे
682.
एकांतीचे गुज पुसो गेलिये सये ।
मी माझी नाही त्यासी कीजे वो काये ॥१॥
ऐसी भेरी निवाडे सांगिजे कोणापुढे ।
मनासी सांकडे पडिले रया ॥२॥
सुलभ सुकुमारु रुपे मनोहरू ।
रखुमादेविवरू परेही परता ॥३॥
अर्थ :
त्या परमात्म्याच्या एकांतात मिळणाऱ्या सुखाचा मी अनुवाद कोणापुढे करावा. म्हणून मी मनाशी विचार करू गेले. तो माझ्या ठिकाणचा मीपणाही नाहीसा होऊन गेला. त्याला आता काय करावे. अशा परमात्म्याच्या भेटीविषयी झालेला निवाडा कोणापुढे सांगू. हे गुह्य सांगण्याचे मला मोठे संकट पडले. विचार केला तर भगवत्प्राप्ती फार सुलभ आहे. तो परमात्मा सुकुमार, नाजूक असून मोठा मनोहर आहे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे परावाणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांचे वर्णन करणे कठीण आहे. असे माऊली सांगतात.
