विश्वास तो देव । म्ह
2662.
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥
माझी वदवितो वाणी । जेणे धरिली धरणी ॥धृपद॥
जोडिली अक्षरे । नव्हेती बुद्धीच्या विचारे ॥२॥
नाही केली आटी । काही मानदंभासाठी ॥३॥
कोणी भाग्यवंत । तया कळे हे उचित ॥४॥
तुका म्हणे झरा । आहे मुळींचाचि खरा ॥५॥
अर्थ :
देव माझा योगक्षेमाचा भार वाहतो हा मला दृढविश्वास आहे, त्यामुळेच मी त्याच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्तीभाव ठेवला आहे. ज्याने पृथ्वी धरली आहे तोच माझी वाणी वदवीत आहे. मी माझ्या बुध्दीच्या विचाराने हे अभंगरुपी अक्षरे जोडलेली नाहीत. मला लोकांमध्ये मानसन्मान मिळावा किंवा दंभासाठी मी ही अभंगरुपी रचना केलेली नाही. जे कोणी खरे भाग्यवंत आहेत त्यांनाच माझ्या या अभंग रचनेचे उचित वर्म कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या ठिकाणी देवाच्या भक्तीरसाचा खरा झरा आहे त्यामुळे तर ही अभंगरचना निर्माण झाली आहे
