(बाळक्रीडा अभंग)
3825.
(बाळक्रीडा अभंग)
गोविंद भ्रतार गोविंद मूळहारी ।
नामे भेद परि एकचि तो । । १ । ।
एकाचींच नामे ठेवियेलीं दोनीं ।
कल्पितील मनी यावे जावे ॥ २ ॥
जावे यावे तिही घरींचिया घरी ।
येथींची शिदोरी तेथे न्यावी । । ३ । ।
विचारिता दिसे येणे जाणे खोटे ।
दाविती गोमटे लोका ऐसे ॥ ४ ॥
लोक करूनियां साच वर्तताती ।
तैशा त्या खेळती लटिक्याची ॥ ५ ॥
लटिके करिती मंगळदायकें ।
लटिकींच एके एका व्याही ॥ ६ ॥
व्याही भाई हरि सोयरा जावई ।
अवघियांच्या ठायी केला एक ॥ ७ ॥
एकासीच पावे जे कांही करिती ।
उपचार संपत्ती नाना भोग ॥ ८ ॥
भोग देती सर्व एका नारायणा ।
लटिक्या भावना व्याही भाई ॥ ९ ॥
लटिकाची त्यांनीं केला संवसार ।
जाणती साचार वेगळा त्या ॥ १० ॥
त्यांनीं मृत्तिकेचे करूनि अवघे ।
खेळतील दोघे पुरुषनारी । । ११ । ।
पुरुषनारी त्यांनी ठेवियेलीं नांवे ।
कवतुक भावे विचरती । । १२ । ।
विचरती जैसे साच भावे लोक ।
तैसे नाही सुख खेळती त्या ॥ १३ ॥
त्यांनी जाणितलें आपआपणया ।
लटिके हे वाया खेळतो ते ॥ १४ ॥
खेळतो ते आम्ही नव्हो नारीनर ।
म्हणोनि विकार नाही तया । । १५ । ।
तया ठावे आहे आम्ही अवघी एक ।
म्हणोनि नि:शंक खेळतील ॥ १६ ॥
तया ठावें नाही हरिचिया गुणे ।
आम्ही कोणकोण काय खेळों । । १७ । ।
काय खातो आम्ही कासया सांगाते ।
कैसे हैं लागते नेणो मुखी । । १८ । ।
मुखी चवी नाही तोंवरी अंगी लाज ।
वर्ण याती काज न धरिती ॥ १९ । ।
न धरिती कांही संकोच त्या मना ।
हांसतां या जना नाइकती ॥ २० ॥
नाइकती बोल आणिकांचे कानी ।
हरि ध्यानीं मनी बैसलासे । । २१ । ।
बैसलासे हरि जयांचिया चित्ती ।
तया नावडती मायबापें ॥ २२ ॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारूनि ।
बळे परि मनी हरि वसे ॥ २३ ॥
वसतील बाळा आपुलाले घरी ।
ध्यान त्या अंतरी गोविंदाचे ॥ २४ ॥
गोविंदाचे ध्यान निजलिया जाग्या ।
आणिक वाउग्या न बोलती ॥ २५ ॥
न बोलती निजलिया हरिविण ।
जागृति स्वप्न एक झाले ॥ २६ ॥
एकविध सुख घेतील त्या बाळा ।
भ्रमर परिमळालागीं जैसा ॥ २७ ॥
जैसा ज्याचा भाव घेतला त्यांपरी ।
तुका म्हणे हरि बाळलीला ॥ २८ ॥
अर्थ :
त्या गवळणींनी एक कृष्णच आपला नवरा आहे व ज्याच्याकडून ( माहेरी ) न्यावयास मूळ ( नेण्याकरिता आलेला आमंत्रण ) येते तोहि कृष्णच आहे. फक्त नांवांत भेद आहे. ह्यावाचूंन दुसरे नाही, असे त्यांनी मानले आहे. आम्हांस माहेरी न्यावयास मूळ आले. आता आम्हाला नवऱ्याकडे जावयाचे आहे, अशी दोन प्रकारची कल्पना करून एका देवावरच त्यांचे लक्ष आहे. जाण्यायेण्याचा प्रकार आपल्या घरचे घरींच दाखवितात व पापपुण्यात्मक शिदोरी असेल सी कृष्णास अर्पण करितात. त्या कारणाने त्यांच्या जन्ममृत्यूच्या येरझारा विचार करून पाहिले असता खोट्या आहेत, पण त्या लोकांप्रमाणे खऱ्या दाखवितात. लोक जन्ममृत्यु खरे मानून वर्तणूक करितात आणि त्या गवळणी ( जन्ममृत्यु, प्रपंच ) खोटे मानून क्रीडा करितात. शुभदायक कृत्यें लोकांप्रमाणे करितात पण ती खोटी मानितात. व्याही, जावई व आपला भाऊ वगैरे सर्व आप्त मंडळींच्या ठिकाणी एक कृष्णच त्यांनी मानिला आहे. त्या योगाने त्यांनी नागाप्रकारचे भोग-उपचार जरी केले, तरी ते एका कृष्णास अर्पण होतात. एका नारायणास सर्व प्रकारचे भोग देतात म्हणून त्यांची इतर आप्तपणाची भावना खोटी आहे. मग त्या जरी प्रपंच करितात तरी आम्ही त्यापासून वेगळ्या आहोंत असे समजतात. हे सर्व जग पंचभूतात्मक मातीचे करून प्रकृतिपुरुष हे उभयता खेळ खेळतात. एक पुरुष, एक प्रकृति अशी दोन नांवे ठेवून प्रपंचामध्यें कौतुकानें वर्तणूक करितात. तोच प्रपंच खरा आहे असे मानून लोक राहतात आणि ह्यांचा खेळ त्याप्रमाणेच आहे, पण त्याचे सुख ह्या मानीत नाहींत. कारण त्यांना आपण मूळचे कोण आहोत हे समजल्यामुळे हा प्रपंच सर्व व्यर्थ आहे असे त्या मानितात. आम्ही ह्या ठिकाणी खेळतों पण नारी अथवा नर हे नव्होंत असे जाणल्यामुळे देहादि प्रपंचाची बाधा त्यांना होत नाही. आणि आम्ही सर्व जण एक देवच आहोत असे समजून निर्भयपणाने प्रपंचाचा खेळ त्या खेळतात. एका श्रीहरीच्या योगाने आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत व काय खेळतो अशी आठवण त्यांना नाही. त्या जरी भोजन करीत असल्या तरी कोणता पदार्थ कशाबरोबर खातो आणि हे चांगले किंवा वाईट हे भान त्यांचे ठिकाणी नाही. चांगले किंवा वाईट ही गोडी त्यांच्या मुखास समजत नाही, मग त्यांच्या ठिकाणी लज्जा कोठून येईल, अगर वर्णाश्रमधर्मांची गरज तरी काय ? मग त्यांस पाहून लोक जरी हंसले तरी त्याविषयीचा संकोच त्या मनामध्ये मुळींच घरीत नाहीत. लोकांचे हंसणे व बोलणे त्या ऐकत नाहीत, कारण चित्तामध्ये श्रीहरीची वस्ती झाली आहे. ज्याच्या चित्तामध्ये हरीचें ध्यान लागले, त्यास आपले आईबाप देखील आवडत नाहीत. अशा त्या आनंदरूप खेळत असता त्यांच्या आईबापांनी जरी बळाने घरी बोलावून नेल्या तरी त्याचे मन श्रीहरीच्या ठिकाणी जडलेले असते. अंतःकरणामध्ये कृष्णाचे ध्यान करून आपापल्या घरी त्या मुली आनंदरूप राहातील. निजल्या ठिकाणी किंवा जाग्या असतांना देखील कृष्णावांचून दुसरे भाषण त्या करीत नाहीत. जी अवस्था जागृतीच्या ठिकाणी तीच स्वप्नामध्ये लागल्यामुळे हरीवांचून व्यर्थ बोलणे त्या बोलत नाहीत. ज्याप्रमाणे भ्रमराला कमलांतील सुवासावांचून कांही आवडत नाही त्याप्रमाणे एकविध सुखाचा उपभोग त्या गवळणी भोगतात. तुकाराम महाराज म्हणतात, ह्याप्रमाणे कृष्णाने बाळपणी जसा ज्याचा भाव असेल तसे त्यांस सुख दिले.
