वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १७, वासुदेव अभंग ९६५ ते ९६६

घुळघुळा वाजती टाळ ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074585 · अभंग क्र. ९६६

966.
घुळघुळा वाजती टाळ ।
झणझणा नाद रसाळ ।
उदो जाली जाहाली वेळ ।
उठा वाचे वदा गोपाळ ॥१॥
कैसा वासुदेव बोलतो बोल ।
बाळापोटी माय रिघेल ।
मेले माणूस जीत उठवील ।
वेळ काळांते ग्रासील ॥२॥
आता ऐसेंची अवघे जन ।
येते जाते तयापासून ।
जगी जग झाले जनार्दन ।
उदो प्रगटले बिंबले भान ॥३॥
टाळटाळी लोपला नाद ।
अंगोअंगी मुराला छंद ।
भोग भोगितांचि आटला भोग ।
ज्ञान गिळूनि गावा गोविंद ॥४॥
गांवा आत बाहेरी हिंडे आळी ।
देवो देविची केली चिपळी ।
चरण नसता वाजे धुमाळी ।
ज्ञानदेवाची कांति सांवळी ॥५॥

अर्थ :
कृतार्थ झालेला महात्मा वासुदेवाच्या रुपाने येऊन. अविद्यारुपी निद्रेत झोपलेल्या जीवांना जागे करीत आहे. भजन करतांना टाळांचा आवाज कधी घुणघुण कधी झुणझुण कधी लहान कधी मोठ्यांने अशा टाळ्यांच्या प्रेमळ आवाजांत मी भजन करीत असता सूर्योदयाची वेळ आली आहे. याकरिता बांबानो उठा आणि वाणीने गोपाळाचे भजन करा. मी वासुदेव कोणत्या दृष्टीने सांगतो इकडे लक्ष द्या. नामस्मरणाच्या योगाने बोध प्राप्त होईल. भक्ती ही आई तिच्या पोटी बोध हा मुलगा येईल. याहीवरी पार्था । माझे भजनी आस्था । या ओवीप्रमाणे बोधरुपी पुत्राच्यापोटी भक्तिरुपी आई जन्माला येईल. त्या भक्तिचे असे सामर्थ्य आहे की मेलेल्या मनुष्याला देखील ती भक्ति जीवंत करील. (उदा. सच्चिदानंद बाबाचे किंवा गोरोबाकांकाच्या मुलाचे) अशा त-हेने ती भक्ति वेळ काळाचा ग्रास करील. व दुसरा अर्थ असा की असा हा भीक मागायाला आलेला वासुदेव तुम्हाला काय म्हणतो ते ऐका ज्या अविद्येने आपल्या पोटांतून जीव उत्पन्न करुन त्याला मेल्याची स्थिती आणली होती. ती अविद्या त्या जीवाच्या पारमार्थिक स्वरुपाचे ठिकाणी नष्ट होऊन जिंवत केल्याप्रमाणे तुम्हाला उठवील, ही स्थिती ज्या वेळेला होईल तीच वेळ जगत भक्षक काळाचा नाश करणारी आहे. असे समजावे. ही जी एका व्यक्तिची स्थिती त्याचप्रमाणे सर्व जीवांची आहे. हे जग ज्यांच्यापासून होते तो जनार्दनच आता सर्व जगतांमध्ये प्रगट होऊन त्यांचे भान सर्व लोकांत झाले आहे. ज्या आनंदांत टाळ किंवा टाळ्यांच्या नाद लुप्त होऊन ज्या छंदाने वासुदेवाचे भजन होते, तो छंदहि मुरुन भोग भोगीत असतांहि भोगाची आटणी होऊन झालेल्या वासुदेवाच्या ज्ञानाचाही लय होऊन वैष्णवांचे, गोविंदाचे गाणे चालले आहे. असे भजन करावे आता असा भजन करणारा पुरुष गावाच्या आळीत हिंडत असताहि तो त्याच्या बाहेर आहे. त्याच्या चिपळ्या म्हणजे प्रकृति पुरुषाच्या आहेत. वस्तुतः त्या भगवत् भक्ताला चरण नसतांहि नाचण्यांचा आवाज घुमत आहे. असे भजन करित असता
शामसुंदर वर्णाचा जो भगवान श्रीकृष्ण त्यांचीच कांति माझे अंगावर उमटली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग