(श्री ज्ञानेश्वर महा
3389.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
नको काही पडो ग्रंथाचिये भरी । शीघ व्रत करी हेचि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावे देवा । ओस देहभावा पाडोनिया ॥धृपद॥
साधने घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकी न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नोहे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी पातली अंगसंगे जरा । आता उजगरा कोठवरी ॥४॥
तुका म्हणे घाली नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥
अर्थ :
ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यांस तुकाराम महाराज उपदेश करु लागले आहेत ते म्हणतात की, अनेक ग्रंथाच्या भरीस तू आता पडू नकोस त्वरेने एकच उपाय कर, देहभाव नाहीसा करुन देवाची आवड मनात धरुन देवाला नेहमी आळवत राहा. हे साधन सोडून तू इतर कोणतेही साधन करु नकोस कारण इतर साधने तुला काळाच्या मुखामध्ये घालतील त्यामुळे तुला अनेक गर्भवास भोगावे लागतील इतर साधनामुळे ते गर्भवास तुला चुकणार नाही. मेल्यानंतर मोक्ष मिळेल खरा तर तो मोक्ष नाहीच मुद्दामहून पाप कर्म करुन अध:पतनाची इच्छा धरु नये. अरे देहाच्या संगतीमुळे तुला आता वृध्द अवस्था आली आहे आणि ह्या उजगरा म्हणजे उजाळा तरी कोठपर्यंत तुला करुन दयावा ? तुकाराम महाराज म्हणतात, आता तू नामासाठी उडी घाल म्हणजे सतत हरीचे नामचिंतन करीत राहा म्हणजे पाडूरंग तुला या भवसागराच्या पलीकडे पोहोचविल.
