येती कीर्तना आल्हादे
1423.
येती कीर्तना आल्हादे । गाती नाचती परमानंदे । सुखाची ती दोंदें । आनंदें तयासी ॥१॥
धन्य धन्य कीर्तन । धन्य धन्य संतजन । जाले कीर्तनी पावन । परमानंदगजरी ॥२॥
हरि कृष्ण गोविंद । हाचि तया नित्य छंद । तेणे जाय भेदाभेद । कीर्तनगजरीं ॥३॥
एका जनार्दनी सार । कीर्तनी केलासे निर्धार । आणिक नाही दुजा विचार । कीर्तनावांचोनी ॥४॥
