इंद्रियाचे पुरे कोड
2928.
इंद्रियाचे पुरे कोड । तेचि गोड पुढती ही ॥१॥
जावे म्हणती पंढरपुरा । हाचि बरा संसार ॥धृपद॥
बैसले ते मनामुळी । सुख डोळी देखिले ॥२॥
तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
अर्थ :
जे कार्य केल्याने इंद्रियांचे लाड पूर्ण होतात तेच कार्य पुन्हा करावेसे वाटते व इंद्रियांना तेच कार्य गोड वाटते. या न्यायाने ज्या हरीभक्तांचे पंढरपूरला जाऊन इंद्रिय सुखावतात ते हरीभक्त म्हणतात पंढरपूरला जावे आणि जे संसाराचे दास आहेत त्यांच्या इंद्रियाचे सर्व लाड संसारत पूर्ण होतात त्यामुळे ते म्हणतात हाच संसार बरा आहे. जे मनाच्या मूळाजवळ बसले आहे ते प्रत्यक्ष डोळयाने पाहिले की सुख होते. तुकाराम महाराज म्हणतात, व ज्या कार्याने इंद्रिय सुखावले जातात तेच कार्य ऐकण्याकडे मनुष्य कान देतात व तेच ऐकतात आणि आपआपल्या दृष्टीने जे चांगले वाईट आहे ते निवडून मनुष्य काढतात.
