भक्त समागमे सर्वभावे
1974.
भक्त समागमे सर्वभावे हरी । सर्व काम करी न संगता ॥१॥
साठवला राहे हृदयसंपुष्टी । बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥धृपद॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥२॥
तुका म्हणे जीव भाव देवापायी । ठेवूनि ते काही न मगती ॥३॥
अर्थ :
अर्थ : –खरा भक्त हा देवाशी एवढा एकरूप झाला असतो की त्याच्या ध्यानी मनी शयनी नयनी तोच असतो, तो जो काही व्यवहार करतो आणि विचार करतो त्याचा सर्व संबंध देवाशीच असतो त्याच्या इंद्रियांना देखील देवाचाच सोस लागला असतो व ते खऱ्याअर्थाने आणि सर्व भावाने देवाशीच समागम करतात. व अशा या भक्तांचे देव देखील न सांगता सर्व कामे करतो. तसेच अशा या भक्तांसाठी तो त्यांच्या हृदयात वास करून राहतो आणि त्यांच्या नयनांची भूक भागवण्यासाठी त्यांच्या समोर मूर्ती रूपात उभा राहतो. तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा केव्हा भक्ताला देवाकडे काही मागायचे झाल्यास फक्त त्याच्या मुखाकडे पाहून त्याचे ध्यान केले असता तो भक्तांची सर्व मनोरथे पूर्ण करतो परंतु हे आगळे भक्त उलट स्वतःचा जीव भावच देवाच्या पायी वाहून, अर्पण करून त्या बदल्यात काहीही मागणे पसंत करत नाहीत.
