लांब धावे पाय चोरी ।
2619.
लांब धावे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥
आता कैसे होय याचे । सिजता काचे राहिले ॥धृपद॥
खाय ओकी वेळोवेळा । कैसी कळा राहेल ॥२॥
तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥
अर्थ :
लोकांबरोबर धावताना जो लांब लांब पळतो तोच थकल्यानंतर पाय चोरी करुन हळूहळू पळत असतो. आता याचे कसे होईल जसे अन्न शिजताना एखादा कुचर दाणा शिजतच नाही त्याप्रमाणे हा धावताना सुरवातीला जोरात पळाला आणि थकल्यानंतर पाय चोरी करुन पळू लागला आहे. जो अन्न खातो आणि लगेच वेळोवेळा सारखे ओकतो त्याच्या अंगी तेजस्वीपणाची कळा कशी राहील ? तुकाराम महाराज म्हणतात, जसे दुखणे बरे होत आले परंतू ते पुन्हा पालटले असा शीण जे भक्तीभाव न ठेवता परमार्थ करतात त्यांना होतो.
