निज लक्षाचे लक्ष हरप
159.
निज लक्षाचे लक्ष हरपले भान । दिन मान शून्य जया माजी ॥१॥
ते ब्रह्म गोजिरे गोपाळ संगती । संवगडे सांगाती भाग्यवंत ॥२॥
वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर । ध्यानाचा प्रकार कृष्णरासी ॥३॥
निवृत्ति म्हणे ते स्वरूप सौख्य रूपडे । पाहाती चहूंकडे योगीजन ॥४॥
अर्थ:
जे स्वरुप काळ, स्थल, हुन परे आहे त्या निर्गुण परब्रह्माठायी योगी ज्याला आपले लक्ष मानतात त्या लक्षला विसरतात. तेच गोजिरे कृष्णपरब्रह्म आपले भाग्यवान सोबती गोपाळांबरोबर राहते. ज्या वेणुच्या वादनामुळे यमुनेचे जळ ही पांगुळते नव्हे नव्हे यमुनेलाही त्याचे ध्यान लागते. निवृतिनाथ म्हणतात, तेच कृष्णरुप नित्य सर्वत्र व्यापक, सुखरुप, ब्रह्मस्वरुप आहे त्यालाच योगी सर्व ठिकाणी पाहतात.
